पश्चिम बंगाल निवडणुकांमध्ये आता प्रचार शिगेला पोहोचला आहे. अवघ्या २४ तासांत पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपा विरूद्ध ममता दीदी हा चुरशीचा सामना सुरू झाला आहे. भाजपाने सुवेंदु अधिकारी यांना ममता दीदींविरोधात उभं केलं असलं, तरी ममता दीदींनी त्यांचा सामना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशीच असल्याप्रमाणे प्रचार सुरू ठेवला आहे. शुक्रवारी झालेल्या प्रचारसभेमध्ये त्यांनी थेट मोदींवर निशाणा साधताना त्यांच्यावर खोचक टीका केली आहे. “इथे उद्योगविश्वाचा विकास थांबला आहे, फक्त त्यांची (पंतप्रधान नरेंद्र मोदी) दाढी वाढते आहे. कधी ते स्वत:ला स्वामी विवेकानंद म्हणवून घेतात, तर कधी स्टेडियमला स्वत:चं नाव देतात. त्यांच्या डोक्यात काहीतरी बिघाड झाला आहे. त्यांचा स्क्रू ढिला झालाय असं वाटतंय”, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. एएनआयनं यासंदर्भात माहिती दिली आहे.

 

ममता दीदी विरुद्ध सुवेंदू अधिकारी सामना!

२७ मार्च म्हणजेच शनिवारी पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. तर २९ एप्रिल रोजी शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होत असून २ मे रोजी निकाल जाहीर होतील. खुद्द ममता बॅनर्जी नंदीग्राममधून निवडणूक लढवणार असून त्यांच्या विरोधात त्यांचेच एकेकाळचे विश्वासू सहकारी आणि सध्या भाजपामध्ये सामील झालेले सुवेंदु अधिकारी यांना भाजपाने नंदीग्राममधून उभं केलं आहे. दरम्यान, ममता दीदींच्या मतदारसंघात त्यांच्या विरोधात भाजपाला उमेदवार सापडला असला, तरी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार अद्याप भाजपाला ठरवता आलेला नाही.

“त्यांनी साडी नेसण्याऐवजी बर्मुडा घालावा”, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान!

दिलीप घोष यांचं वादग्रस्त विधान!

पश्चिम बंगालचे भाजपा प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी नुकतीच अप्रत्यक्षपणे ममता बॅनर्जी यांच्यावर केलेल्या टीकेमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. “त्यांनी प्लास्टर काढून पायाला बँडेज बांधलं आहे. तो पाय सगळ्यांना दाखवत असतात. अशी साडी नेसलेली मी आजपर्यंत पाहिली नाही. असं असेल तर त्यांनी साडीऐवजी बर्मुडा घालावा, म्हणजे व्यवस्थित दिसू शकेल”, असं विधान दिलीप घोष यांनी केलं होतं. त्यावरून तृणमूल काँग्रेसच्या महिला नेत्या आणि अनेक नेटिझन्सनी दिलीप घोष यांचा समाचार घेतला होता.