पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या तीन जांगासाठी झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये दोन जागांवर भाजपाचा पराभव झाला आहे. मात्र या पोटनिवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान राज्याच्या ममता बॅनर्जी मुख्यमंत्री आणि राज्यपाल जगदीप धनखड यांच्यातील वादाला नव्याने तोंड फुटलं आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी आपल्यावर असभ्य भाषेत टीका केल्याचा आरोप राज्यपालांनी केला आहे. ट्विटवरुन त्यांनी हे आरोप केले असून संविधान दिनाच्या कार्यक्रमानंतर बोलताना मुख्यमंत्र्यांनी माझ्यासाठी ‘तू चीज बडी है मस्त मस्त’ असे शब्द वापरल्याचे धनखड म्हणाले आहेत.

राज्यामध्ये पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची धामधूम सुरु असतानाच धनखड यांनी ट्विटवरुन ममतांवर हल्लाबोल केला. एका बंगाली भाषेतील वृत्तपत्राच्या कात्रणाचा फोटो शेअर करत धनखड यांनी “मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांबद्दल बोलताना थेट नवा न घेता तू चीज बडी है मस्त मस्त असं म्हटलं आहे. मात्र मुख्यमंत्री आणि त्यांच्याकडे असलेल्या पदाचा मान राखत मी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्याचे टाळतोय,” असं ट्विट केलं आहे.

राज्यपालांच्या या टीकेवर ममता यांनी काहीच उत्तर दिलेले नाही. मात्र पोटनिवडणुकींच्या निकालानंतर ममतांनी भाजपावर निशाणा साधला आहे. “लोकांना भारतीय असल्याचे सिद्ध करावयास सांगणाऱ्या भाजपाला मतदारांनी नाकारले आहे. भाजपाला त्यांच्या उद्धटपणाची किंमत चुकवावा लागील आहे. पोटनिवडणुकीतील हा विजय आम्ही पश्चिम बंगालमधील जनतेला समर्पित करीत आहोत,” असं ममतांनी म्हटले आहे.