काँग्रेस आणि डाव्यांचा विरोधाला कडवी टक्कर देत सलग दुसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी औपचारिकपणे शुक्रवारी हातात घेतली. कोलकात्यात झालेल्या कार्यक्रमात ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पक्षाच्या इतरही नेत्यांनी यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली. पश्चिम बंगालचे राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांनी सर्वांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
शपथविधी सोहळ्याला केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली, नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक राजू, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो, राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला उपस्थित होते.
गेल्याच आठवड्यात झालेल्या मतमोजणीमध्ये तृणमूल काँग्रेसने विधानसभेत जवळपास दोन तृतीयांश बहुमत मिळवत पुन्हा एकदा पश्चिम बंगालमधील सत्ता काबीज केली होती.