विद्यापीठांतील हिंसाचार, सीएए या मुद्दय़ांवर विरोधकांमधील फूट उघड

कोलकाता : ‘गरज पडल्यास मी एकटी लढेन,’ असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी राज्य विधानसभेत जाहीर केले. विद्यापीठांमधील हिंसाचार आणि सुधारित नागरिकत्व कायदा या मुद्दय़ांवर काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांनी १३ जानेवारीला बोलावलेल्या बैठकीवर आपण बहिष्कार घालणार असल्याचीही घोषणा त्यांनी केली. यामुळे या मुद्दय़ांवर विरोधी पक्षांमधील फूट उघड झाली आहे.

आर्थिक उपाययोजना आणि नवा नागरिकत्व कायदा व देशव्यापी एनआरसी यांच्यासारख्या ज्वलंत मुद्दय़ांसह ‘लोकविरोधी’ धोरणांच्या विरोधात डावे पक्ष आणि काँग्रेस यांच्याशी संलग्न संघटनांनी पुकारलेल्या कामगार संघटनांच्या बंद दरम्यान पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनांमुळे तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष असलेल्या ममता बॅनर्जी चिडलेल्या आहेत.

विधानसभेने सीएएच्या विरोधात ठराव पारित करावा असा आग्रह विरोधकांनी धरला असता; ‘सोनिया गांधी यांनी १३ जानेवारीला आयोजित केलेल्या बैठकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय मी घेतला आहे, कारण डावे पक्ष व काँग्रेस यांनी राज्यात बुधवारी घडवून आणलेल्या हिंसाचाराचे मी समर्थन करत नाही,’ असे ममता यांनी सभागृहात जाहीर केले.

देशव्यापी राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या (एनआरसी) विरोधात सभागृहाने यापूर्वीच गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ठराव संमत केलेला असल्यामुळे, नव्याने ठराव करण्याची काही गरज नाही, असे ममता म्हणाल्या.

विरोधी पक्षांच्या आमदारांनी नव्याने ठराव करण्याचा हट्ट धरला, तेव्हा वादळी व्यक्तिमत्त्व असलेल्या ममता यांनी आवेशपूर्ण भाषण करत स्वत:च्या भूमिकेचे समर्थन केले आणि आपण सोनियांच्या बैठकीला जाणार नसल्याचे जाहीर केले.

‘तुम्ही लोक पश्चिम बंगालमध्ये एक धोरण पाळता आणि त्याच्या पूर्णपणे विसंगत असे धोरण दिल्लीत पाळता, त्यामुळे मला तुमच्यासोबत राहायचे नाही. गरज पडल्यास मी एकटीच लढेन,’ असे सांगून ममता यांनी काँग्रेस व डाव्या आघाडीच्या आमदारांवर हल्ला चढवला.