‘पद्मावती’चे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि त्यांच्या चमूचे पश्चिम बंगालमध्ये स्वागत केले जाईल आणि या चित्रपटाच्या प्रीमियर आणि प्रदर्शनासाठी विशेष व्यवस्था केली जाईल, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी येथे स्पष्ट केले.

या चित्रपटावरून निर्माण झालेला वाद म्हणजे देशातील विचारस्वातंत्र्य नष्ट करण्याची सुनियोजित योजना आहे, असे ट्वीट बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वीच केले होते. भन्साळी आणि त्यांचा चमू ‘पद्मावती’ चित्रपट अन्य कोणत्याही राज्यांत प्रदर्शित करू शकले नाहीत तर आम्ही त्यासाठी पश्चिम बंगालमध्ये विशेष व्यवस्था करू, बंगालला त्याचा अभिमान आणि आनंदच वाटेल, भन्साळी आणि त्यांच्या चमूचे आमच्या राज्यात स्वागत आहे, असे बॅनर्जी म्हणाल्या.

‘पद्मावती’चा वाद केवळ दुर्दैवीच नाही तर विचारस्वातंत्र्याची गळचेपी करण्याची एका राजकीय पक्षाची सुनियोजित योजना आहे, आम्ही या महाआणीबाणीचा निषेध करतो, असे बॅनर्जी यांनी ट्वीट केले होते.