मालदा (पश्चिम बंगाल) : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शनिवारी पश्चिम बंगालमध्ये शेतकऱ्यांसमवेत जमिनीवर बसून खिचडीचा आस्वाद घेतला आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वत:च्या अहंकारापोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजनेच्या लाभांपासून वंचित ठेवले असल्याचा आरोपही या वेळी नड्डा यांनी केला.
नड्डा म्हणाले की, भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची शेतकऱ्यांच्या कल्याणाशी बांधिलकी आहे. राज्यातील शेतकऱ्यांपासून आपला पक्ष दूर जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची अंमलबजावणी करण्याचे मान्य केले, असेही नड्डा म्हणाले.
पंतप्रधान किसान योजनेपासून शेतकऱ्यांना वंचित ठेवून ममता बॅनर्जी यांनी त्यांच्यावर अन्याय केला आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्याच्या मार्गात त्यांचा अहंकार आडवा आला, त्याचा फटका ७० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना बसला, या शेतकऱ्यांना गेल्या दोन वर्षांपासून दरवर्षी सहा हजार रुपयांपासून वंचित राहावे लागले, असेही नड्डा म्हणाले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पश्चिम बंगालच्या नाडिया जिल्ह्यातील नवद्वीप येथून शनिवारी ‘परिवर्तन यात्रे’ची सुरुवात केली.
जय श्रीराम घोषणाबाजीत रोड-शो
मालदा : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शनिवारी जय श्रीरामच्या जयघोषात मालदामध्ये रोड-शो केला. फुलांनी सजविलेल्या ट्रकवर प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्यासमवेत उभे राहून नड्डा दुतर्फा गर्दी केलेल्या समर्थकांच्या स्वागताचा हसतमुखाने स्वीकार करीत होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 7, 2021 2:35 am