पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या छोट्या भावाचं करोनामुळे निधन झालं आहे. करोनाबाधित असीम बॅनर्जी यांच्यावर गेल्या महिनाभरापासून उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आज सकाळी त्यांनी रुग्णालयात अंतिम श्वास घेतला. कोलकातातील मेडिका सुपरस्पेशालिटी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.

असीम बॅनर्जी यांच्या निधनानं त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कोविड प्रोटोकॉलनुसार त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येतील असं कुटुंबातील सदस्यांनी सांगितलं आहे.

‘मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा छोटा भाऊ असीम बॅनर्जी यांचं आज सकाळी रुग्णालयात निधन झालं आहे. ते करोनाबाधित होते आणि त्यांच्यावर उपचार सुरु होते.’, असं मेडिका रुग्णालयाचे चेअरमन डॉ. अलोक रॉय यांनी सांगितलं.

‘…उसने माँ गंगा को रुलाया है’; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पंतप्रधानांवर अप्रत्यक्षरित्या टीका

पश्चिम बंगालमध्ये निवडणुका पार पडल्यानंतर पुन्हा एकदा करोनानं डोकं वर काढल्याचं दिसत आहे. गेल्या काही दिवसात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे सरकारने ३० मे पर्यंत शाळा, महाविद्यालयं या व्यतिरिक्त शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबरोबर अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवांवर निर्बंध लादण्यात आले आहेत.