पश्चिम बंगालमध्ये या वर्षी एप्रिल – मे महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपा व तृणमूल काँग्रेसने ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याचे दिसत आहे. दरम्यान, सध्या दोन्ही पक्षांकडून एका पाठोपाठ एक सभा घेतल्या जात आहेत. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हावडा येथील भाजपाच्या रॅलीला संबोधित केले. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर निशाणा साधल्याचे दिसून आले.

“तृणमूल काँग्रेस आणि अन्य पक्षांचे नेते भाजपात प्रवेश करत आहेत. निवडणूक संपल्यानंतर ममता बॅनर्जी स्वतःला एकट्या उरल्याचं पाहातील. राज्यातील जनतेबरोबर त्यांनी अन्याय केला आहे. त्यांनी पश्चिम बंगलला प्रत्येक क्षेत्रात पिछाडीवर नेलं आहे. राज्यातील जनता त्यांना कधीच माफ करणार नाही.” असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.

यावेळी अमित शाह हे देखील म्हणाले की, “ममता दीदी बंगालच्या जनतेला आयुष्मान भारत योजनेचा मिळू देत नाहीत, कारण ही योजना मोदींनी सुरू केली. मी बंगलाच्या जनतेला विश्वास देतो की, भाजपाचे सरकार आल्यानंतर आम्ही पहिल्याच कॅबिनेटमध्ये प्रस्ताव मांडू की राज्यात ही योजना लागू व्हावी. ममता दीदीने मागील काही दिवसांमध्ये एक कागद पाठवला आहे की, आम्ही शेतकरी सन्मान निधी योजना लागू करण्यासाठी सहमत आहोत. दीदी तुम्ही कुणाला फसवत आहात, केवळ कागदच पाठवला आहे. त्यासोबत शेतकऱ्यांची यादी देखील पाहिजे, बँक खाते क्रमांक पाहिजे, तुम्ही हे काहीच पाठवलेलं नाही.”

दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या घोषणेआधीच सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला गळती लागली आहे. काही महिन्यांपासून तृणमूलचे नेते भाजपाची वाट धरताना दिसत आहेत. त्यात आता आणखी पाच नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शाह यांच्या उपस्थित कमळ हाती घेतलं. दिल्लीत या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे भाजपाला आणखी राजकीय बळ मिळालं आहे. तर तृणमूल काँग्रेस आणखी एक हादरा बसला आहे.

ममतांना आणखी एक धक्का: तृणमूलच्या पाच नेत्यांचा भाजपात प्रवेश

राजीब बॅनर्जी, वैशाली दालमिया, प्रबीर घोषाल, राथिन चक्रवर्ती आणि रुद्रनील घोष यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर पाचही नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर अमित शाह यांनी ट्विट करून याची माहिती दिली.