पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणूकीवरून सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेस आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. स्थानिक निवडणूकांसाठी सुरक्षेच्यादृष्टीने केंद्रीय फौजांना तैनात करण्याची मागणी राज्य निवडणूक आयुक्त आणि विरोधी पक्षांनी केल्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी संतप्त झाल्या आहेत. राज्यात आतापर्यंत झालेल्या स्थानिक निवडणुकांसाठी केंद्रीय फौजांची गरज पडली नव्हती तर आताच त्याची गरज काय असा सवाल करीत ममतांनी गुरुवारी विरोधकांसह निवडणूक आयुक्तांविरोधातही राग व्यक्त केला.
राज्यात २००१,२००३ आणि २००८ मध्ये पंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्यावेळी कुठे केंद्रीय फौजा तैनात करण्यात आल्या होत्या,असा सवालही ममतांनी पश्चिम मिदनापूर जिल्ह्य़ातील निवडणूक सभेत विचारला.
पंचायत निवडणूक ही काही सर्वसाधारण मोठी निवडणूक नाही. राज्यात सर्व काही सुरळीत चालू असताना अशाप्रकारची मागणी कशासाठी, असेही त्यांनी म्हटले.
राज्यात तटस्थ सरकार आल्यापासून निवडणुका शांत वातावरणात पार पडल्या. त्याउलट परिस्थिती डाव्या आघाडी सरकारच्या काळात होती.
पंचायत निवडणूक झाल्या नाहीत तर विकास कामांना खिळ बसेल. त्यामुळे निवडणूका होणार असून ग्रामीण जनतेचा मतदानाचा हक्क हिरावता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच निवडणूका झाल्या नाहीत आणि निवडणून आलेली पंचायत समिती अस्तित्वात आली नाही तर विकासकामांना होणाऱ्या दिरंगाईबाबत भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्‍सवादी) जबाबदार असेल,असेही ममता बॅनर्जी यांनी सांगितले.