पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी दुचाकीवर पाठीमागे बसून राज्याचे सचिवालय गाठले आणि इंधन दरवाढीचा वेगळ्या पद्धतीने निषेध केला. राज्यातील मंत्री फिरहाद हकीम यांनी इलेक्ट्रिक दुचाकी चालविली त्यावर ममता बॅनर्जी पाठीमागे बसल्या होत्या.

आजपासून आंदोलन

या वेळी ममतांनी पेट्रोल दरवाढीचा निषेध करणारा एक फलक आपल्या गळ्यावर बांधला होता आणि हेल्मेट घातलेल्या ममता रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांना अभिवादन करताना दिसत होत्या. तृणमूल काँग्रेस पक्ष शुक्रवारपासून इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन पुकारणार असल्याचे त्या म्हणाल्या.

४५ मिनिटांचा प्रवास करून सचिवालयात पोहोचल्यानंतर ममतांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आणि आम्ही इंधन दरवाढीचा निषेध करीत असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार खोटी आश्वासने देत आहेत, इंधन दरवाढ कमी करण्यासाठी त्यांनी काहीच केले नाही. मोदी सरकार सत्तेवर आले तेव्हाचे आणि आताचे इंधन दर यामधील फरक तुम्ही पाहू शकता, असेही मुख्यमंत्री म्हणाल्या.

सत्तेवर येण्यापूर्वी मोदी सरकारने जनतेला एलपीजी जोडण्या विनामूल्य देण्याचे आश्वासन दिले होते आणि आता सरकार त्याची दरवाढ करीत आहे. मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देश विकत आहेत. हे जनताविरोधी, महिलाविरोधी आणि युवक व शेतकरीविरोधी आहे, असेही त्या म्हणाल्या.

स्टेडियम नामकरणावरून टीका

अहमदाबादमधील सरदार पटेल स्टेडियमला (मोतेरा स्टेडियम) पंतप्रधानांचे नाव दिल्याबद्दलही ममतांनी भाजप सरकारवर टीका केली. ज्या पद्धतीने स्टेडियमची नावे बदलण्यात येत आहेत त्यावरून ते कदाचित उद्या देशाचेही नाव बदलतील, असेही ममता म्हणाल्या.