केंद्र सरकारची नाराजी; कठोर पावले उचलण्याचे निर्देश

लोकसभा निवडणुकीच्या निकालापासून पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराबाबत केंद्र सरकारने चिंता व्यक्त केली आहे. हिंसाचार रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत केंद्राने राज्य सरकारला कायदा व सुव्यवस्था राखण्याचे निर्देश दिले आहेत.

निकालानंतर राज्यात हिंसक घटना सुरूच आहेत. सत्तारूढ तृणमूल काँग्रेस व भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीत उत्तर २४ परगाणा जिल्ह्य़ातील संदेशखली येथे तिघांचा बळी गेल्यानंतर केंद्राने राज्य सरकारला याबाबत निर्देश दिले आहेत. हा भाग बशिरहट मतदारसंघात येतो. तेथून तृणमूलच्या नुसरत जहाँ रुही यांनी भाजपच्या शत्यंन बसू यांचा पराभव केला होता. दरम्यान, या हिंसाचारात पाच कार्यकर्ते ठार झाल्याचा दावा भाजपने केला आहे. तर तृणमूल काँग्रेसने आपले सहा कार्यकर्ते बेपत्ता असल्याचा दावा केला आहे. रविवारी या भागात तणाव होता. दोन्ही पक्षांनी एकमेकांवर हिंसाचाराला चिथावणी दिल्याचा आरोप केला आहे.

राज्यपाल पंतप्रधानांना भेटणार :  पश्चिम बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहेत. सर्वच समाजघटकांनी शांतता राखावी, असे आवाहन त्रिपाठी यांनी केले आहे. जीवित व वित्तहानी होणे दुर्दैवी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आज भाजपचा बंद

बसिरहाट येथील स्थिती रविवारी तणावपूर्ण होती. शुक्रवारच्या हिंसाचारात ठार झालेल्या भाजप कार्यकर्त्यांचे मृतदेह पक्ष कार्यालयात नेण्यास पोलिसांनी मज्जाव केला. त्याच्या निषेधार्थ भाजपने सोमवारी १२ तासांच्या पश्चिम बंगाल बंदची हाक दिली आहे. तसेच न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.