पश्चिम बंगालमध्ये रथ यात्रेला परवानगी नाकारल्याबद्दल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर कडाडून टीका केली. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी लोकशाहीचा गळा घोटत आहेत. त्या भाजपाला घाबरल्या आहेत असे अमित शाह म्हणाले. कोलकाता उच्च न्यायालयाने गुरुवारी कूचबिहारमधून रथयात्रा काढायला भाजपाला परवानगी नाकारली.

राज्य सरकारने न्यायालयात भाजपाच्या रथयात्रेला विरोध केला. न्यायालयाने सरकारचा युक्तीवाद मान्य करत भाजपाला परवानगी नाकारली. न्यायालयाच्या या निर्णयानंतर अमित शाह यांनी आज पत्रकार परिषद घेतली. पश्चिम बंगालमध्ये आम्ही नक्कीच रथ यात्रा काढू. कोणी आम्हाला रोखू शकत नाही असे अमित शाह म्हणाले.

ममता बॅनर्जी भाजपाला घाबरल्या आहेत त्यामुळेच त्या रथ यात्रा रोखण्याचा प्रयत्न करत आहेत असे अमित शाह म्हणाले. रथ यात्रेमुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो हा राज्य सरकारचा युक्तीवाद कोर्टाला पटला. या रथ यात्रेच्या निमित्ताने पुढच्या दीड महिन्यात राज्यातील सर्व २९४ विधानसभा मतदारसंघात पोहोचण्याचा भाजपाचा उद्देश होता. पुढच्यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपर्यंत राज्यात सर्वदूर पोहोचण्याचे भाजपाचा उद्देश आहे.