तृणमूल काँग्रेसला रामराम करून अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी मंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या बालेकिल्ल्यातून म्हणजेच नंदिग्राम येथून विधानसभेची पुढील निवडणूक लढविणार असल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी येथे जाहीर केले.

विधानसभेच्या पुढील निवडणुकीत ममता यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी भाजपने जोरदार प्रचार सुरू केला असतानाच ममता बॅनर्जी यांनी नंदिग्राम येथून निवडणूक लढविण्याचे जाहीर करून भाजपला त्यांचे आव्हान स्वीकारल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. प्रतिस्पर्धी पक्षांमध्ये जे प्रवेश करीत आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला काळजी नाही, कारण तृणमूल काँग्रेसची स्थापना होण्याच्या वेळी पक्षामध्ये आलेले आहेत, असे बॅनर्जी यांनी येथे एका सभेत सांगितले.

ज्या नेत्यांनी गेल्या काही वर्षांत जी माया जमविली आहे तिचे रक्षण करण्यासाठी हे नेते सत्तारूढ पक्ष सोडून अन्य पक्षांमध्ये प्रवेश करीत आहेत, असे त्या म्हणाल्या. आपण नेहमीच नंदिग्राम येथून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे, हा भाग आपल्यासाठी सुदैवी आहे, त्यामुळे याच ठिकाणाहून यंदा निवडणूक लढण्याचा विचार आपण केला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुब्रत बक्षी यांनी आपल्याला या मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, अशी आपण त्यांना विनंती करीत आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाल्या. या वेळी व्यासपीठावर असलेल्या बक्षी यांनी ही विनंती मान्य केली.

..तर राजकारण संन्यास घेणार – अधिकारी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नंदिग्राम मतदारसंघातून विधानसभेची पुढील निवडणूक लढविण्याचे जाहीर केले असून त्यांचे आव्हान भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी स्वीकारले आहे. या निवडणुकीत आपण ममता बॅनर्जी यांचा पराभव करू अन्यथा राजकारणातून संन्यास घेऊ, असे अधिकारी यांनी सोमवारी स्पष्ट केले. तथापि, कोणत्या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी द्यावयाची याचा अंतिम निर्णय भाजपचे नेतृत्व सविस्तर चर्चा करू घेईल, तृणमूल काँग्रेसप्रमाणे मनमानी पद्धतीने घेणार नाही, असेही अधिकारी म्हणाले.