अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी दुबईला पसार झाल्याची माहिती समोर येतेय. ‘इफेड्रीन’च्या तस्करीमध्ये ममता आणि तिचा पती विकी गोस्वामीचं नाव पुढे आलं होतं. अमेरिकेच्या ड्रग एन्फोर्समेंट अॅडमिनिस्ट्रेशनने DEA फेब्रुवारीमध्ये विकी गोस्वामी आणि त्याच्या तीन साथीदारांना केनियातून अटक केली होती. ममता कुलकर्णीविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावण्याची प्रक्रिया ठाणे पोलिसांनी सुरू केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

२००० कोटी रुपयांच्या इफेड्रीन तस्करीप्रकरणी हे दोघेही आरोपी आहेत. स्पेशल नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (NDPS) अॅक्ट कोर्टाने ममता आणि विकीला दोषी ठरवून त्यांच्या संपत्तीच्या जप्तीचे आदेश दिले होते. केनियातून विकीसोबत त्याचे साथीदार इब्राहिम, बख्ताश आक्शा आणि पाकिस्तानी अमली पदार्थ वितरक गुलाम हुसैन यांनाही अटक करण्यात आली होती. चौघांच्या अटकेवेळी ममताही घटनास्थळी होती. मात्र ती पोलिसांच्या हाती सापडली नाही.

विकीच्या अटकेनंतर ममताही आता दुबईला पसार झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. गेल्या वर्षी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागानं एव्हॉन लाइफसायन्सेस कंपनीवर छापे मारले होते. त्यात २ हजार कोटी रुपयांचा इफेड्रीन जप्त केला होता. या प्रकरणी आतापर्यंत १४ जणांना अटक करण्यात आली आहे. विकी गोस्वामी या रॅकेटचा मास्टरमाईंड असून ममता कुलकर्णीने त्याला या तस्करीत साथ दिली होती.