पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांचे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करु शकणार नाही असा दावा, भाजपाचे पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी केला आहे. बंगालमध्ये तृणमुल काँग्रेस आणि भाजपामधील तणाव वाढला आहे. यापार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केले आहे.

जय श्रीराम प्रकरणावरुन भाजपाने ममतांना टार्गेट केले आहे. त्यासाठी भाजपाने ममतांना ‘जय श्रीराम’ ही घोषणा लिहीलेली १० लाख पोस्टकार्ड पाठवण्याची तयारी केली आहे. तर दुसरीकडे तृणमुल काँग्रेसने ‘जय हिंद-जय बांगला’ अशी घोषणा लिहीलेली २० लाख पोस्टकार्ड मोदी आणि शाह यांनी पाठवणार असल्याचे म्हटले आहे.

कैलाश विजयवर्गीय म्हणाले, ममता बॅनर्जींचे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करु शकणार नाही. कारण त्यांच्या पक्षांतर्गत आणि नेत्यांमध्ये मोठा असंतोष असून ते कधीही पक्ष सोडू शकतात. इतकेच नव्हे तर पक्षाच्या अनेक मोठ्या नेत्यांना या गोष्टीची भीती आहे की, ममतांचा भाचा अभिषेक आगामी काळात त्यांचा राजकीय वारसदार असेल. या मुळे पक्षाच्या मोठ्या नेत्यांना याची भीती वाटत आहे. त्यामुळेच हे सर्व असंतुष्ट नेते तृणमुल काँग्रेस सोडू शकतात. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.

जय श्रीराम प्रकरणावरुन निर्माण झालेल्या वादावर बोलताना विजयवर्गीय म्हणाले, लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर आमचे कार्यकर्ते विजयाचा आनंद साजरा करीत असताना त्यांच्यावर हल्ला होतो. तीन भाजपा कार्यकर्त्यांची या काळात हत्या केली गेली. यामुळे रागावलेल्या ममता बॅनर्जींना जय श्रीराम ही घोषणाही शिव्यांसारख्या वाटत आहेत. एखाद्या धार्मिक मंत्राला आपण शिवी कसे काय समजू शकता. जर त्यांना हे असेच वाटतं असेल तर बंगालच्या जनतेने त्यांना धडा शिकवायला हवाच.