मेव्हणीवर बलात्कार आणि त्यानंतर जबरदस्तीने तिला गर्भपातास भाग पाडल्याच्या आरोपातून दिल्लीच्या न्यायालयाने येथील एका नागरिकाची निर्दोष मुक्तता केली. गुन्हा घडल्यानंतर तब्बल नऊ महिन्यांनी तक्रार का नोंदविली, याचा खुलासा करण्याकामी सदर महिला आणि पोलीसही अपयशी ठरले असून फिर्यादींनी रचलेली कथाही बनावट ठरली असल्याचे ताशेरे न्यायालयाने मारले आहेत.अतिरिक्त सत्र न्यायाधीश निवेदिता अनिल शर्मा यांनी हा निकाल दिला.

दिल्लीच्या पश्चिम विभागात वास्तव्यास असलेल्या एका नागरिकाविरोधात २७ वर्षांच्या महिलेने दाखल केलेली तक्रार खोटी असल्याचे जाणवत आहे, असाही शेरा न्यायालयाने मारला. सदर अपराध घडल्याच्या तक्रारीप्रकरणी या महिलेने तातडीने तक्रार करण्याकामी का विलंब झाला, याचा समाधानकारक खुलासा फिर्यादी पक्षाने केलेला नाही, असा शेरा न्यायालयाने मारला.
संशयित आरोपी स्वत: विवाहित असताना आणि वैवाहिक जीवन धोक्यात येण्याची त्याला धास्ती असताना बलात्कार करून त्याने गर्भपातास भाग पाडले, हे फिर्यादीचे म्हणणे खरे वाटत नाही, असेही न्यायालयाने नमूद केले.
सन २०१३ मध्ये आपल्या पतीने घराबाहेर काढल्यामुळे सासरच्या घराचा त्याग केला. त्या वेळी या मेव्हण्याने हस्तक्षेप करून आपल्याला त्याच्या घरी नेले. तेथे त्याने सुमारे नऊ महिने वारंवार आपल्यावर बलात्कार केला तसेच तो मारहाणही करीत होता. यामुळे आपण गर्भवती राहिलो आणि नंतर त्याने आपल्याला गर्भपात करण्यास भाग पाडले. एवढेच नव्हे तर त्याने परत आपल्यावर बलात्कार केला, अशी साक्ष या महिलेने न्यायालयात दिली.
हा खटला सुरू असताना संबंधित आरोपीने आपण निर्दोष असल्याचे सांगून पैसे उकळण्याच्या मिषाने आपल्याला या खोटय़ा खटल्यात गोवण्यात आल्याचा दावा केला. एखाद्या माणसाने एकदा बलात्कार केला तर सदर महिला वारंवार त्याच्याकडे जात राहील, यावर विश्वास बसत नाही. अशा प्रकारे बलात्कारित महिला ही बाब आपल्या कुटुंबीयांना किंवा निकटवर्तीयांना सांगणार नाही, हेही पटत नाही. एखादा पुरुष आपल्याकडे गैरपद्धतीने बघत असेल आणि त्याने बलात्कार केला, तिला धमक्या दिल्या तर ती त्याबद्दल तातडीने तक्रार करील, याकडेही न्यायालयाने लक्ष वेधले.