22 November 2017

News Flash

मुलीची छेड काढल्याच्या आरोपावरून तरूणाची अर्धनग्न धिंड

शंकर राठोड मेळ्यासाठी भावाच्या घरी आला असल्याची माहिती समोर

लोकसत्ता ऑनलाईन | Updated: July 17, 2017 7:33 PM

मुलीची छेड काढल्याच्या संशयावरून धिंड

मुलीची छेड काढल्याच्या संशयावरून कर्नाटकात एका माणसाला अर्धनग्न करून आणि त्याचे केस कापून त्याची धिंड काढण्यात आली. शंकर राठोड असं या पीडित माणसाचं नाव आहे. ही घटना कर्नाटकातल्या बिजापूरमध्ये हितन्नहल्ली तांडा या गावात ही घटना घडली आहे. उमराज राठोडनं त्याच्या चुलत भावाला म्हणजेच शंकर राठोडला गावात लागलेल्या मेळ्यासाठी घरी बोलावलं. त्यानंतर शंकर आपल्या भावाकडे आला, शंकर ११ जुलै रोजी उमराजकडे आला. १२ जुलैच्या सकाळी उमराज जेव्हा शंकरला उठवायला गेला तेव्हा त्याला त्याच्या मुलीचा हात शंकरच्या हातात दिसला.

झोपेत असलेल्या शंकरला उमराजनं उठवलं आणि या दोघांमध्ये भांडण झालं. तू माझ्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करत होतास का? असा प्रश्न उमराजनं शंकरला विचारला, मात्र शंकरनं या प्रश्नाचं उत्तर नाही असंच दिलं. तरीही उमराजचं समाधान झालं नाही. १२ जुलैच्या सकाळी उमराजनं त्याचे नातेवाईक बोलावले आणि शंकरनं त्याच्या मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप केला. उमराजच्या सांगण्यानंतर घरातले सगळेच नातेवाईक चिडले आणि त्यांनी शंकरला खेचत घराबाहेर आणलं, त्याचे कपडे काढले, त्याचे केस कापले आणि त्याला बेदम मारहाण करत गावभर त्याची धिंड काढली.

या सगळ्या धक्क्यातून बाहेर पडून शंकरनं पोलिसात धाव घेतली आणि घडलेला प्रकार सांगितला तसंच उमराजविरोधात तक्रारही दाखल केली. मात्र उमराज आणि इतर नातेवाईकांना हे समजलं तेव्हा त्यांनीही शंकर विरोधात तक्रार दाखल केली. मात्र शंकरसोबत जे काही घडलं आहे त्यामुळे त्याला जबर धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसात लोकांनी मारहाण केल्याच्या आणि धिंड काढल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत आणि ही बाब निश्चितच काळजी करण्यासारखी आहे असं वक्तव्य जिल्हाधिकारी एम. बी. पाटील यांनी केलं आहे. उमराज आणि त्याच्या दोन मुलांनी शंकर विरोधात तक्रार केल्यानं शंकरची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. मात्र अशा घटना घडणं हे समाजाची मानसिकता दर्शवणारं आहे असंच दिसून येतं आहे. जून महिन्यात एक महिलेला लुटण्यात आलं आणि तिचा विनयभंगही करण्यात आला. या प्रकरणाचाही तपास सुरू आहे असंही पोलिसांनी म्हटलं आहे.

First Published on July 17, 2017 7:27 pm

Web Title: man allegedly misbehaves with woman paraded in skirt with half shaved head in vijayapura by womans family