दिल्ली पोलिसांनी एका ५६ वर्षांच्या वृद्धाला महिलेला अश्लील इशारे केल्याप्रकरणी अटक केली आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आंतरदेशीय टर्मिनलवरून या वृद्धाला अटक करण्यात आली आहे. हैदराबाद-दिल्लीच्या इंडिगो फ्लाईटमध्ये हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या लेखी तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. हैदराबादहून दिल्लीला येणाऱ्या विमानात एक ४४ वर्षीय महिला प्रवास करत होती. त्यावेळी या ५६महि वर्षांच्या वृद्धाने तिच्याकडे पाहून अश्लील शेरेबाजी सुरू केली. ज्यानंतर या महिलेने अलार्म वाजवला.

विमान कर्मचाऱ्यांनी तातडीने या महिलेला तिची जागा बदलून दिली. तसेच या वृद्धाविरोधात दिल्लीत उतरून पोलिसात तक्रार करा असेही सांगितले. त्यानंतर या महिलेने दिल्ली विमानतळ गाठल्यावर या वृद्धाविरोधात तक्रार केली. ज्यानंतर अश्लील चाळे करणाऱ्या या वृद्धाला पोलिसांनी अटक केली आहे. अश्लील शेरेबाजी करणारा हा वृद्ध विमानात पीडित महिलेच्या शेजारीच असलेल्या सीटवर बसला होता. ही महिला जागेवर येताच त्याने आपल्या पँटची चेन उघडून अश्लील चाळे केले, तसेच या महिलेला अश्लील इशारेही करून दाखवले. ज्यानंतर या महिलेने तातडीने अलार्म वाजवला, आपली जागा बदलून घेतली.

महिला आणि मुलींच्या छेडछाडीचे प्रकार रस्त्यावर, किंवा निर्जन ठिकाणी होताना दिसतातच. बस, किंवा ट्रेनच्या प्रवासादरम्यानही अनेकदा महिलांना छेडछाडीला सामोरे जावे लागते. मात्र आता विमानातही महिला प्रवासी सुरक्षित नाहीत हेच या घटनेवरून दिसून येते आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी अशा गुन्हेगारांना चांगलीच अद्दल घडवली पाहिजे. तोवर असे प्रकार घडणे थांबणार नाही.