आत्तापर्यंत तुम्ही एखाद्याला सोन्याचे दागिणे चोरल्याबद्दल किंवा आर्थिक अफरातफर केल्याबद्दल अटक झाल्याच्या बातम्या वाचल्या असतील. मात्र अमेरिकेमध्ये एका वयोवृद्धाला चक्क ३६२ किलो (८०० पाऊंड) लिंबं चोरल्याप्रकरणी अटक करण्यात आले आहे. डियोनिको फिओरोस असे या व्यक्तीचे नाव असून कॅलिफोर्निया पोलिसांना त्याला अटक केली आहे.

ट्रॅफिक सिग्नलवर पोलिसांनी डियानिको यांचा ट्रक तपासणीसाठी थांबवला त्यावेळी हा प्रकार उघडकीस आल्याचे स्थानिक पोलिसांनी ऑनलाइन जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. गाडी थांबवून तपासणी केली असता गाडीमध्ये शेकडो पिशव्यांमध्ये लिंबं अढळून आली. या लिंबांबद्दल डियानिकोकडे चौकशी करण्यात आली असता त्याला समाधानकारक उत्तर देता आले नाही. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या सांगण्याप्रमाणे हे लिंबू आजूबाजूच्या शेतामधून चोरलेले आहेत. मात्र हा सर्वप्रकार उघडकीस आल्यानंतर डियानिको एवढ्या लिंबांचे काय करणार होता असा प्रश्न पोलिसांनाही पडला आहे. पोलिसांना डियानिकोला ताब्यात घेऊन या चोरी मागील उद्देश काय होता याची चौकशी केली. कोर्टासमोर डियानिकोला हजर केल्यानंतर कोर्टाने १० हजार डॉलरच्या जामीनावर त्याची सुटका केली आहे.

असोसिएट प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार थर्मल परिसरामध्ये मागील अनेक दिवसांपासून शेतमाल चोरीला जाण्याच्या घटना घडत होत्या. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी या परिसरामध्ये काही ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरु केली होती. याच तपासणीदरम्यान डियानिकोला अटक करण्यात आली.