उत्तरप्रदेशमध्ये गुन्हेगारीच्या घटनांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. लखनऊमधल्या काकोरी परिसरात अंगावर काटा आणणारा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. एका माणसावर त्याच्याच घराच्या बाहेर सहा ते सात गुंडांनी मिळून हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात केवळ पत्नीमुळे तो सुदैवानं वाचला असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.

अबिद अली असं जखमी व्यक्तीचं नाव असून वैयक्तीक वादातून दिवसाढवळ्या त्याच्यावर गुंडांनी हल्ला केला. काठ्या, हातोड्यानं त्याच्यावर जबरदस्त वार करण्यात आले. अबिदच्या घराच्या अंगणात हा संपूर्ण प्रकार घडला. अबिदच्या आवाजानं त्याची पत्नी घरातून पिस्तुल घेऊन धावत आली. हवेत गोळ्या झाडत तिनं गुंडानं पळवून लावले. तिच्या हातात पिस्तुल पाहून गुंडांनी पळ काढला पण, वेळीच या दोघांना धडा शिकवण्यात येईल अशी धमकी गुंडांनी या दोघांना दिली. या प्रकरणात काकोरी पोलिसांत अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणात अधिक चौकशी करत आहे.

गुंडांच्या हल्ल्यामुळे अबिद जबरदस्त जखमी झाला असून त्याचा पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.