व्हॉट्स अ‍ॅपवर पत्नीला ट्रिपल तलाक देणाऱ्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केरळमधील कासारगोड या ठिकाणी ही घटना घडली आहे. कासारगोडमधील कुडलू गावात राहणाऱ्या एकाने त्याच्या पत्नीला व्हॉट्स अ‍ॅप वरुन ट्रिपल तलाक दिला. या संदर्भातली तक्रार या माणसाच्या पत्नीने रविवारी रात्री दिली त्यानंतर आता ट्रिपल तलाक देणाऱ्या या माणसावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१५ मार्च रोजी या माणसाने त्याच्या पत्नीला व्हॉट्स अ‍ॅपवर व्हॉईस मेसेज पाठवून तलाक तलाक तलाक असे म्हटले होते. याप्रकरणी त्याच्या पत्नीने तक्रार दिली आहे. जेव्हा हा मेसेज पाठवण्यात आला तेव्हा माझा पती गल्फमध्ये होता असेही त्याच्या पत्नीने म्हटले आहे.

माझ्या पतीने भावाच्या मोबाईलवर व्हॉट्स अ‍ॅपवर व्हॉईस कॉल करुन मला ट्रिपल तलाक दिला असे या महिलेने सांगितल्याचे पोलिसांनी पीटीआयला सांगितले. आता याप्रकरणी या महिलेच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इ. के. उसाम असे या माणसाचे नाव आहे. त्याला ३१ ऑगस्टला अटक करण्यात आली. आता त्याच्यावर पत्नीला ट्रिपल तलाक दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोझीकडे येथील मुक्कोम या ठिकाणी उसामला अटक करण्यात आली. कारण उसाम फक्त पत्नीला व्हॉट्स अॅपवर तलाक देऊन थांबला नाही तो पत्नीच्या घरी गेला आणि त्याने तिच्या आई वडिलांसमोर तिला तीन वेळा तलाक दिला. मॅजिस्ट्रेट कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर उसामला अटक करण्यात आली.