जिवंत असताना शासनाकडून मिळणाऱ्या सुविधा आणि त्याचा लाभ मिळणे अनेकांसाठी अवघडच. पण मृत्यूनंतरही शासकीय यंत्रणा तितकीच निर्दयी वागणूक देत असेल तर? याचेच एक उदाहरण नुकतेच समोर आले. मध्यप्रदेशमधील टिकमगड येथील एका मुलावर अतिशय वाईट प्रसंग ओढावला. तो म्हणजे आईचा मृतदेह नेण्यास शववाहिनी न मिळाल्याने बाईकवरुन मृतदेह न्यावा लागला. साप चावल्यामुळे या मुलाच्या आईचा मृत्यू झाला. कुटुंबियांनी मृत्यू झाल्याचे समजताच त्याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यावेळी पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेन करावे लागेल असे सांगितले. मग या मुलाने मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी त्याठिकाणी फोन केला आणि शववाहिनी मिळण्याबाबत चौकशी केली.

त्यावेळी कोणतेही कारण न देता या मुलाला शववाहिनी नाकारण्यात आली. वारंवार फोन करुनही रुग्णालयाने शववाहिनी पाठविण्यास नकार दिला. जिल्हा रुग्णालयाकडून अशाप्रकारची गोष्ट घडणे हा प्रकार धक्कादायक असल्याचे समोर आले आहे. शववाहिनी मिळत नसल्याने अखेर मुलाने आपल्या आईचा मृतदेह बाईकवरुन नेण्याचे ठरवले आणि त्याने आईला बाईकवर बसवून मृतदेह बाईकला बांधून तो रुग्णालयात दाखल झाला. हा संपूर्ण प्रकार जिल्हाधिकाऱ्यांसमोर आला. त्यानंतर त्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. आपल्याला जन्म दिलेल्या आईचा मृत्यू होणे हा तर प्रत्येक व्यक्तीसाठी कठिण प्रसंग आहे. मात्र या मुलावर त्याहूनही वाईट वेळ ओढवली. अशाप्रकारे आईचा मृतदेह बाईकवरुन वाहून न्यावा लागणे आणि त्यासाठी शववाहिनी न मिळणे ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे.