तरुणीचे तिच्याच घरासमोरून अपहरण करून बलात्कार करण्याचा धक्कादायक प्रकार बंगळुरूत घडला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या तरुणीचे अपहरण होत असताना रस्त्यावरून जाणाऱयांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली. तरुणी मदतीसाठी आरडाओरड करत असूनही तिच्या मदतीला कोणीच धावून आले नाही. बंगळुरूत घडलेला हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
तरुणी फोनवर बोलत असताना अपहरणकर्त्याने तिला ओढतच नेले. हे अपहरण नाट्य सुरू असताना रस्त्यावरून एक महिला आणि मोटारसायकलवर दोन व्यक्ती जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसते. अपहरणकर्त्याने तोंडावर कपडा बांधला होता.
मी ओरडत होते. त्याने माझे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला. माझी सुटका करून घेण्यासाठी मी त्याचा प्रतिकार करण्यास सुरूवात केली. पण त्याने मला मारहाण केली आणि मी घाबरले. माझ्याजवळ बॅग आणि मोबाईल फोन होता पण ते हिसकावून घेण्याचा तो प्रयत्न करत नव्हता. त्याचा उद्देश दुसराच होता, असे पीडीत तरुणीने सांगितले. अथक प्रयत्नांनंतर अपहरणकर्त्यांच्या तावडीतून तरुणीची कशीबशी सुटका झाली. तिने झालेला संपूर्ण प्रकार माध्यमांना सांगितला. तसेच पोलीस ठाण्यात तक्रार देखील नोंदविण्यात आली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने याप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेतल्याचे समजते.