आग्रा येथील एका व्यक्तीला जामीन मिळाल्यानंतर आनंदाच्या भरात त्याने हवेत गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी त्याला पुन्हा नवीन गुन्ह्याखाली अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जीमी चौधरी या ३५ वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली होती. नारकोटिक ड्रग्स अ‍ॅण्ड सायकोट्रॉफिक सब्स्टेंसेस अ‍ॅक्ट १९८५ नुसार म्हणजेच अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी जीमीला अटक करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच त्याला जामीन मंजूर झाला होता.

जामीन मिळाल्यानंतर जीमीच्या वागणुकीमध्ये विशेष फरक पडला नाही. जामीन मिळाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी त्याने बंदुकीमधून हवेत गोळीबार केला. इतकच नाही तर त्याने या सेलिब्रेशनचा व्हिडिओ आपल्या सोशल नेटवर्किंग अकाउंटवरही पोस्ट केला. याचबरोबर त्याने अजून एक व्हिडिओ अपलोड केला. यामध्ये त्याने रस्त्यावरील फेरीवाल्यालाला मारहाण केल्याचे दिसत होते. फेरीवाल्याला मारहाण केल्यानंतर त्याच्या डोक्यावर पाणी ओतताना या व्हिडिओत जीमी दिसत आहे. या फेरीवाल्याच्या डोक्यात पाणी ओतून झाल्यावर अचानक जीमीने त्याच्या डोक्यात काचेची बाटली फोडताना व्हिडिओत दिसते. हे दोन्ही व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर चांगलेच व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी जीमीला पुन्हा अटक केली आहे.

जीमी हा अवस विकास कॉलीनीमधील सेक्टर १५ बीमधील रहिवाशी आहे. जीमी हा एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचा मुलगा असून त्याच्याविरोधात पोलिसांकडे २० हून अधिक गुन्हे दाखल आहेत.