कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातला असून अनेकांच्या मनात भीती निर्माण केली आहे. याच भीतीपोटी आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे. दुर्दैवी बाब म्हणजे कोरोना व्हायरसची लागण झाल्याचा गैरसमज झाल्याने त्याने आत्महत्या केली. संबंधित ५४ वर्षीय व्यक्ती आजारी होती. यावेळी आजाराची लक्षणं पाहून आपल्याला कोरोना व्हायरसची लागण झाली असल्याचा त्याचा गैरसमज झाला.

डॉक्टरांनी त्याला स्पष्टपणे कोरोनाची लागण झालं नसल्याचं सांगितलं होतं. मात्र यानंतरही त्याने गावकरी तसंच डॉक्टरांना आपल्यापासून लांब राहण्यास सांगितलं होतं. संसर्ग झाला असल्याने इतर कोणता संसर्ग होऊ नये यासाठी डॉक्टरांनी त्याला मास्क घालण्याचा सल्ला दिला होता. यानंतर त्याच्या वागणुकीत बदल झाला होता. आणि त्यातच त्याने कुटुंब आणि गावकऱ्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी आत्महत्या केली.

त्याच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार, “ते प्रचंड घाबरले होते. आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची त्यांना खात्री वाटत होती. इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी आपला मृत्यू झालाच पाहिजे असं ते वारंवार बोलत होते. अखेर आत्महत्या करुन त्यांनी आपलं जीवन संपवलं”.