उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील जरवल येथे इलाहाबाद बँकेत शुक्रवारी सकाळी एका तरुणाने अंगावर पेट्रोल टाकून स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याने एकच धावपळ सुरु झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनराजपूर गावचा रहिवासी असणारा हा तरुण बँकेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आश्वासन दिलेले १५ लाख रुपये मागण्यासाठी आला होता.

पोलिसांनुसार, धनराजपूरचा रहिवासी असणारा मौजीलाला नावाचा तरुण सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बँकेच्या शाखेत पोहोचला होता. बँकेत पोहोचल्यानंतर त्याने तिथे उपस्थित कर्मचाऱ्यांकडे नरेंद्र मोदींनी आश्वासन दिलेले १५ लाख अजून मिळाले नसून, ते पैसे आपल्याला द्यावेत अशी मागणी केली. बँकेने मागणी फेटाळून लावताच त्याने त्याच्याकडील पेट्रोल बँकेत छिडकण्यास सुरुवात केली. सर्वांनी बाहेर जावा, मी शाखेत आग लावत आहे अशी धमकी देण्यास त्याने सुरुवात केली होती.

यानंतर बँकेत एकच धावपळ सुरु झाली ज्यामुळे अनेकजण जखमीदेखील झाले. यानंतर तरुणाने बँकेत आग लावण्याचाही प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी झाला नाही. माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तरुणाला अटक करत चौकशी सुरु केली. याप्रकरणी तपास करणारे अधिकारी अभय सिंह यांनी तरुणाची मानसिक स्थिती योग्य नसल्याचं सांगितलं आहे. तरुणाच्या कुटुंबालाही कळवण्यात आलं आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करत घटनेची तपासणी सुरु केली आहे.