वाराणसी येथील पुलाचा काही भाग कोसळून १८ जण ठार झाले. या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला आणि शक्य ती सगळी मदत देण्याचे आश्वासन दिले. ही घटना घडल्याला चोवीस तास उलटण्याच्या आत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेतले मृतदेह सुंदरलाल रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले होते. हे मृतदेह शवागारातून बाहेर काढण्यासाठी कर्मचाऱ्याने प्रत्येकी २०० रुपये घेतल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. ही बातमी पसरताच संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी मृतदेह काढण्यासाठी पैसे घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. टाइम्स नाऊने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदार संघ आहे. कर्नाटक निकालाच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी या ठिकाणी बांधकाम सुरु असलेल्या पुलाचा काही भाग कोसळला आणि १८ लोक ठार झाले. या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अतीव दुःख व्यक्त केले. हे मृतदेह सुंदरलाल रुग्णालयात ठेवण्यात आले होते. या रुग्णालयाच्या शवागारातून ते मृतदेह काढून नातेवाईकांना सोपवण्याआधी प्रत्येकाकडून २०० रुपये घेण्यात आल्याचा आरोप होतो आहे. पूल दुर्घटनेत मृत्यू झालेल्या लोकांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर हा आरोप केला आहे. तसेच जेव्हा कर्मचारी पैसे मागत होते तेव्हा एक दोघांनी त्यांचे ते वर्तन मोबाइलच्या कॅमेरातही कैद केलं आहे. या व्हिडिओत कर्मचारी मृतदेह ताब्यात देण्यासाठी २०० रुपये मागताना स्पष्टपणे दिसत आहेत.

हा सगळा प्रकार समोर येताच डीएम योगेश्वर राम मिश्र बीएचयू या ठिकाणी पोहचले. त्यांनी या प्रकरणातल्या कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी कलम ३८४ अन्वये या कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणात मृतदेह ताब्यात देण्याच्या बदल्यात २०० रुपये घेणाऱ्या कर्मचाऱ्याला आम्ही अटक केली आहे अशी माहिती एसएसपी आर. के. भारतद्वाज यांनी दिली.