नशीब कोणाला कशी साथ देईल सांगता येत नाही. अनेकदा सर्व आशा सोडून दिल्यानंतर अचानक नशीब साथ देते आणि एखाद्या मोठ्या संकटातून अगदी सहज सुटका होते. असचं काहीसं घडलं अमेरिकेतील ख्रिस्तोफर प्रिकोपीयाबरोबर. ख्रिस्तोफरच्या आईने क्लिक केलेल्या एका सेल्फीमुळे त्याचा ९९ वर्षांचा तुरुंगवास टळला आहे.

खरं म्हणजे २१ वर्षीय ख्रिस्तोफरने कोणताच गुन्हा केला नव्हता तरी पोलिसांनी त्याला त्याच्या एक्स गर्लफ्रेण्डने केलेल्या आरोपावरून अटक केली. झालं असं की २२ सप्टेंबर २०१७ रोजी नेहमीप्रमाणे ख्रिस्तोफर आपल्या जॉर्जटाऊन येथील घरी काम करत होता. अचानक काही पोलिसांनी त्याच्या घरातील अंगणामधून काही गोष्टी ताब्यात घेत त्याला घरफोडी तसेच इतर काही गंभीर गुन्हे केल्याप्रकरणी अटक केली. नक्की आपल्याबरोबर काय होत आहे हे समजण्याआधीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. माझ्याबरोबर नक्की काय घडत आहे याची कल्पना मला येत नव्हती. मला अगदी हरवल्यासारखं झालं होतं. मात्र माझ्या आईने काढलेल्या एका सेल्फीमुळे माझी सुटका झाल्याचं ख्रिस्तोफर सांगतो.

ख्रिस्तोफरच्या एक्स गर्लफ्रेण्डने २१ सप्टेंबर २०१७ रोजी पोलिसांकडे त्याच्याविरोधात तक्रार केली. २० सप्टेंबर रोजी ख्रिस्तोफर बळजबरीने माझ्या घरात शिरला. त्याने कटरने आपल्या छातीवर वार केले आणि तो पळून गेल्याचे तिने आपल्या तक्रारीत म्हटल्याचे डेली मेलने आपल्या वृत्तामध्ये नमूद केले आहे. मात्र ज्यावेळी हे घडल्याचे ख्रिस्तोफरच्या एक्स गर्लफ्रेण्डने म्हटले त्यावेळी तो शहरामध्ये नव्हताच. ‘युएस टूडे’ने दिलेल्या वृत्तानुसार ज्या घरफोडीच्या प्रकरणात ख्रिस्तोफरला पोलिसांनी अट केली होती. त्यावेळी तो त्याची आई, इरीनबरोबर कथित घटना घडलेल्या ठिकाणीपासून २० ते २५ किलोमीटवर असणाऱ्या ऑस्टीन हॉटलेमध्ये होता. मात्र पोलिसांना त्याला अटक केली त्यानंतर १ लाख ५० हजार डॉलरच्या जामीनावर त्याची सुटका करण्यात आली खरी मात्र त्याच्यावर ९९ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा असणारा खटला न्यायलयात चालवण्यात आला.

गर्लफ्रेण्डने सांगितलेल्या घटनाक्रमानुसार २० सप्टेंबरला सायंकाळी साडेसातच्या सुमारास ख्रिस्तोफरने घरात घुसून तिच्यावर हल्ला केला. मात्र त्यावेळी मी माझ्या कुटुंबियांबरोबर ऑस्टीन हॉटेलमध्ये असल्याचे ख्रिस्तोफरने न्यायालयात सांगितले. मात्र त्याच्याकडे यासंदर्भात पुरावा नव्हता. त्यावेळी त्याच्या आई इरीनने काढलेला सेल्फी कोर्टासमोर सादर केला. यामध्ये फोटोच्या एका कोपऱ्यात ख्रिस्तोफर दिसत आहे. त्यामुळे कोर्टाने त्यावेळी ख्रिस्तोफरला जामीन मंजूर करुन पोलिसांना अधिक तपास करण्यास सांगितले.

दरम्यानच्या काळात ख्रिस्तोफरला अटक होऊन जामीनावर सुटका झाल्यानंतर ऑस्टीन हॉटेलमध्ये उपस्थित असणाऱ्या ख्रिस्तोफरच्या ओळखीच्या अनेक लोकांनी तो आपल्याबरोबर असल्याचे पुरवा म्हणून त्यांचे लोकेशन आणि काही फोटो फेसबुकवर पोस्ट केले. हा खटला ९ महिने चालला अखेर ख्रिस्तोफरच्या वकिलांनी २१ जून २०१८ रोजी त्याच्या आईने काढलेला तो सेल्फीच कोर्टामध्ये पुरवा म्हणून सादर केला. हा फोटो पुरावा म्हणून ग्राह्य ठरण्याचे प्रमुख कारण ठरले ते म्हणजे फोटो काढताना त्यावर ऑटोमॅटिकली आलेले लोकेशन आणि तारीख. हा फोटो पाहिल्यानंतर बेल काऊण्टी जिल्हातील न्यायाधिशांनी ख्रिस्तोफरची सुटका केली.

या सर्व प्रकरणानंतर इरीनने एक भावनिक पोस्ट फेसबुकवर टाकली असून कोणत्याही पुराव्याशिवाय होणाऱ्या अटकेविरुद्ध आपण आवाज उठवायला हवं असं मत त्यांनी नोंदवले आहे.

या प्रकरणात ख्रिस्तोफरच्या एक्स गर्लफ्रेण्डवर कोणताचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.