News Flash

…मग मुख्यमंत्र्यांनाही अटक करणार का?; अर्णबच्या वकिलांचा सवाल

अर्णब गोस्वामी यांच्या वतीने ज्येष्ठ वकील हरिश साळवे मांडत आहेत बाजू

…मग मुख्यमंत्र्यांनाही अटक करणार का?; अर्णबच्या वकिलांचा सवाल

अन्वय नाईक यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या अंतरिम जामिनाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. अर्णब गोस्वामी यांची जामीन याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर काही तासातच त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली असून त्यावर न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड व न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्या सुटीतील न्यायपीठापुढे सुनावणी सुरु आहे. अर्णब गोस्वामी यांच्या वतीने ज्येष्ठ वकील हरिश साळवे बाजू मांडत आहेत. न्यायालयामध्ये युक्तीवाद करताना साळवे यांनी थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

आत्महत्येस प्रवृत्त करणं व इतर दोन प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी अर्णब यांना अंतरिम जामीन देण्यास नकार देऊन त्यांना स्थानिक न्यायालयात दाद मागण्यास सांगितलं होतं. याच पार्श्वभूमीवर अर्णब यांनी केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान त्यांचे वकील साळवे यांनी अर्णब आणि अन्वय नाईक यांचा थेट काहीही संबंध नव्हता असं म्हटलं आहे. “मागील महिन्यामध्ये महाराष्ट्रामधील एका व्यक्तीने आत्महत्या केली. यावेळी त्याने मुख्यमंत्र्यांमुळे आपल्याला वेळेत पगार मिळाला नाही असं म्हटलं होतं. त्यानंतर तुम्ही काय केलं?, मुख्यमंत्र्यांना अटक केली का?,” असा प्रश्न साळवे यांनी उपस्थित केला.

त्याचप्रमाणे साळवे यांनी न्यायालयासमोर अर्णब आणि अन्वय यांच्यामध्ये कोणतेही खासगी संबंध नव्हते. त्यामुळेच केवळ एखाद्या कराराच्या आधारावर आत्महत्येला प्रोत्साहन दिलं असं म्हणता येणार नाही, असा युक्तीवादही केला. याचप्रमाणे ज्या पद्धतीने अर्णब यांना अटक करण्यात आली त्याबद्दलही साळवे यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली. एकूण २० ते ३० पोलीस त्यांच्या घरी पोहचले आणि त्यांना आधी कोणतीही नोटीस न देता अटक केली. त्यानंतर त्यांना थेट मुंबईवरुन रायगडला नेण्यात आलं, असंही साळवे यांनी न्यायालयाला सांगितलं.

गोस्वामी यांना सध्या तळोजा येथील तुरुंगात ठेवण्यात आले असून त्यांच्या सर्वोच्च न्यायालयातील अपील याचिकेत केंद्र सरकार, अलिबाग पोलीस ठाण्याचे प्रमुख, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग व अक्षता अन्वय नाईक यांना प्रतिवादी केलं आहे. राज्य सरकारच्या वतीने वकील सचिन पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हिएट दाखल केले असून गोस्वामी यांच्या याचिकेवर राज्य सरकारचं म्हणणं ऐकल्याशिवाय कुठलाही आदेश पारित करू नये असे त्यात म्हटलं आहे.

तत्पूर्वी, उच्च न्यायालयाने गोस्वामी तसेच फिरोझ शेख व नितीश सारडा यांची अंतरिम जामिनाची याचिका फेटाळताना म्हटले होते, की आम्ही आमची न्यायकक्षा वापरावी असे यात काही नाही. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी संबंधित सत्र न्यायालयात दाद मागावी. त्यावर सत्र न्यायालय चार दिवसांच्या मुदतीत निकाल देऊ शकेल.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 11, 2020 3:02 pm

Web Title: man in maharashtra committed suicide saying the chief minister failed to pay salary says harish salve scsg 91
Next Stories
1 “अन्वय नाईक यांनी आईची हत्या करुन नंतर आत्महत्या केली”
2 बिहारच्या निवडणुकीत एमआयएमला घवघवीत यश; जाणून घ्या काय होती ओवेसींची रणनीती?
3 Bihar Election : एक जागा जिंकलेल्या ‘लोजपा’ने स्पष्ट केली भूमिका
Just Now!
X