लग्नसमारंभामध्ये पाणीपुरी खाण्यावरुन वर आणि वधूपक्षाकडील पाहुण्यांमध्ये झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाल्याची दूर्देवी घटना झारखंडमध्ये घडली आहे. राज्यातील धनबाद जिल्ह्यामध्ये ही घटना घडली असून शुल्लक कारणावरुन झालेल्या हाणामारीमध्ये एकाचा प्राण गेल्याने लग्नघरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

धनबाद जिल्ह्यातील बाघमारा गावातील संज्योती या मुलीशी दुमारतोला येथे राहणाऱ्या अविनाश दास याचे रविवारी लग्न झाले. लग्नानंतर दोन दिवसांनी अविनाशचे वडील हिरालाल यांनी लग्नाला न येऊ शकलेल्या पाहुण्यांसाठी रिसेप्शनचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी मुलीच्या घरच्यांनाही आमंत्रण देण्यात आले होते.

या रिसेप्शनच्या कार्यक्रमात पाहुण्यांसाठी पाणीपुरीचा स्टॉल लावण्यात आला होता. या स्टॉलवर मुलीचे काका फुलचंद दास हे पाणीपुरी खाण्यासाठी गेले असता तिथे त्यांचा पाणीपुरीवाल्याशी वाद झाला. त्यामध्ये त्यांनी पाणीपुरीवाल्याला धक्काबुक्की केली असता त्याने फुलचंद यांना नीट वागण्याची विनंती केली. या किरकोळ कारणावरुन वाद वाढत गेला आणि काही मिनिटांमध्ये रिसेप्शनच्या ठिकाणी ४० ते ५० जणांनी मुलीकडील पाहुण्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये दिलीप नावाची व्यक्ती जखमी झाली. या व्यक्तीला तातडीने बोरको रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

दिलीप यांच्या मृत्यूनंतर सोमावारी पोलीस चौकशीसाठी बाघमारा गावातमध्ये गेले. त्यावेळी तेथे मुलीच्या नातेवाईकांनी रस्ता रोको करत फुलचंद आणि अविनाश दास यांच्यासहीत त्यांच्या नातेवाईकांवर कारवाई करावी अशी मागणी केली. या प्रकणात पोलिसांनी अविनाश आणि फुलचंद यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.