आंध्र प्रदेशच्या गुंटूरमध्ये एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. येथे दारुच्या नशेत असलेल्या एका व्यक्तीने आपल्या ८० वर्षांच्या वृद्ध आईचा खून केल्याचा प्रकार घडला आहे. आईचा खून करण्यामागील कारण त्याहून धक्कादायक आहे. आईने जेवणामध्ये चिकन बनवलं नाही म्हणून रागाच्या भरात या व्यक्तीने आईचा खून केला. बेजम मरियम्मा असं मृत आईचं नाव आहे.

गुंटूरच्या बडेपुरम येथे राहणाऱ्या बेजम किशोरने (45) चाकू भोसकून आईचा खून केला. त्याला दारुचं व्यसन होतं. रोज दारु पिऊन तो घरी यायचा. रविवारी सकाळी तो चिकन घेऊन आला आणि आईला चिकन बनवण्यास सांगून तो दारु पिण्यासाठी निघून गेला. परतल्यानंतर जेवणामध्ये चिकन करी अजून बनवलेली नसल्याचं लक्षात आल्यानंतर त्याला राग अनावर झाला. तो आईवर ओरडला व त्याने सरळ चाकू घेतला आणि सपासप वार केले.

आईचा खून केल्यानंतर त्याने तेथून पळ काढला. मरियम्मा यांची किंकाळी ऐकून शेजारी घरी आले आणि त्यांनी पोलिसांना घटनेबाबत माहिती दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीची कसून शोध घेतला जात आहे. यापूर्वी किशोरच्या दारुच्या व्यसनामुळे त्याची पत्नीही मुलांना घेऊन घर सोडून गेली आहे.