महिला ठार, दहशतवादाची घटना नाही
मेलबर्न : अल्लाहू अकबरच्या आरोळ्या ठोकत एका व्यक्तीने सिडनीत वर्दळीच्या ठिकाणी अनेकांवर चाकू हल्ला केला त्यात एक महिला ठार तर आणखी एकजण जखमी झाला. हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले आहे. हल्लेखोर हा एकवीस वर्षांचा असून त्याचे नाव मर्ट ने असे आहे. तो मनोरुग्ण असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांच्या मते हे दहशतवादी कृत्य म्हणता येणार नाही. ऑस्ट्रेलियाच्या दूरचित्रवाणी वाहिन्यांनी हल्लेखोर किंग स्ट्रीटवर मोठा चाकू घेऊन अल्लाहू अकबर आरोळ्या ठोकत हल्ले करताना दाखवला. या हल्लेखोराने मर्सिडीज गाडीच्या टपावर व बॉनेटवर उडय़ा मारल्या तसेच एका ४१ वर्षीय महिलेला जखमी केले. आजूबाजूच्या लोकांनी खुर्च्या आडव्या घालून त्याला पकडले. जखमी महिलेने एका हॉटेलमध्ये आसरा घेतला होता. संशयित हल्लेखोराशी परिचित असलेल्या २१ वर्षीय महिलेचा मृतदेह एका अपार्टमेंटमध्ये सापडला आहे. त्या महिलेचा मृतदेह सापडणे व रस्त्यावरील त्याने केलेला हल्ला या दोन्ही घटनांचा संबंध आहे, असे न्यूसाउथ वेल्सचे पोलीस आयुक्त मिक फुलर यांनी सांगितले.
First Published on August 14, 2019 3:51 am