लग्न दोन मनांचे मिलन असते. पण या ठिकाणी अपवाद होता. इथे लग्न तीन मनांचे मिलन होते. ऐकायला थोडे विचित्र वाटेल. पण छत्तीसगडच्या बस्तरमधील एका गावात युवकाने एकाचवेळी दोन तरुणींसोबत लग्नगाठ बांधली. तीन जानेवारीला गावकऱ्यांच्या साक्षीने हा विवाह सोहळा संपन्न झाला.

एकाच मांडवात युवकाने दोन तरुणीसोबत लग्न केले असले, तरी यामध्ये कोणावर जबरदस्ती करण्यात आली नव्हती. सर्वसहमतीने हा लग्नसोहळा पार पडला. हसिना आणि सुंदरी या दोन्ही तरुणींना चंदू मौर्य हा तरुण आवडायचा. बस्तच्या तिकारा लोहंगा गावातील मंडपात तिघांचे लग्न झाले.

“हसिना आणि सुंदरी दोघी मला आवडायच्या आणि त्यांना सुद्धा मी आवडत होतो. सर्व गावकऱ्यांसमोर सर्वसहमतीने आम्ही तिघांनी लग्न केले. माझ्या एका पत्नीचे कुटुंबीय या लग्नाला आले नाहीत” असे चंदूने सांगितले. या लग्नाचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे सगळे गावकरी या लग्नाला उपस्थित होते. कोणीही लग्नाला विरोध केला नाही. दोन्ही वधूंचे बारावीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. सोशल मीडियावर हे लग्न व्हायरल झाले आहे. सर्व गावकऱ्यांसमोर लग्न होण्याची बस्तरमधली ही पहिली घटना आहे.