व्यभिचार आता गुन्हा राहिलेला नाही. त्यामुळे तू मला विवाहबाह्य संबंध ठेवण्यापासून रोखू शकत नाही असे पतीने सुनावल्यानंतर हताश झालेल्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तामिळनाडूत चेन्नईमध्ये एमजीआर नगर येथे शनिवारी ही घटना घडली. सर्वोच्च न्यायालयाने मागच्याच आठवडयात एका खटल्याच्या सुनावणीत व्यभिचाराला गुन्हा ठरवणारे कलम रद्द केले.

पुष्पलता (२४) असे मृत महिलेचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये तिने व्यभिचाराचा मुद्दा आत्महत्येमागचे एक कारण असल्याचे म्हटले आहे. जॉन पॉल फ्रँकलिन (२७) असे आरोपीचे नाव असून तो सुरक्षा रक्षकाची नोकरी करतो. शवविच्छेदनासाठी महिलेचा मृतदेह सरकारी रुग्णालयात पाठवला आहे. कुटुंबाचा विरोध पत्करुन दोघांनी दोन वर्षांपूर्वी लग्न केले होते.

पुष्पलताला क्षयरोग झाल्यानंतर जॉन तिच्यापासून दूर राहू लागला. महिलेचे नातेवाईक आणि शेजाऱ्यांकडे चौकशी केल्यानंतर तो तिला घर चालवायलाही पैसे देत नव्हता अशी माहिती मिळाली. पुष्पलताने तिच्या मनातील भावना जॉनच्या एका मित्राजवळ मोकळया केल्यानंतर त्याने जॉनचे दुसऱ्या एका महिलेबरोबर प्रेम प्रकरण सुरु असल्याचे सांगितले.
जॉन बऱ्याचदा घरी उशिरा यायचा किंवा घरापासून लांब रहायचा. अलीकडेच पुष्पलताने त्याला बाहेर सुरु असलेल्या त्याच्या प्रेम प्रकरणाबद्दल जाब विचारला होता व त्या महिलेपासून दूर रहा अन्यथा पोलिसात तक्रार दाखल करु अशी धमकी दिली होती. शनिवारी रात्री १०.३० च्या सुमारास पुष्पलताने रहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
व्यभिचार हा गुन्हा ठरवणारे कलम ४९७ रद्द करण्याचा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. पती हा पत्नीचा मालक नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. व्यभिचार हा गुन्हा ठरु शकत नाही. पण जर एखाद्या व्यक्तीने जोडीदाराच्या विवाहबाह्य संबंधांमुळे आत्महत्या केली तर ते आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा ठरतो, असे कोर्टाने स्पष्ट केले. अनिवासी भारतीय असलेले जोसेफ शाइन यांनी वकील सुविदुत सुंदरम यांच्या मार्फत कलम ४९७ च्या वैधतेला आव्हान दिले होते. यात गुन्हेगारी दंडसंहिता कलम १९८(२) चाही समावेश आहे. व्यभिचारात केवळ पुरूषांनाच दोषी ठरवून शिक्षा केली जाते, याबाबत स्त्रियांचाही विचार समान पातळीवर करावा, अशी मागणी त्यांनी केली होती.

आधी व्यभिचाराचे कलम काय होते
भादंवि कलम ४९७ नुसार एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या पुरूषाच्या पत्नीशी त्याच्या संमतीशिवाय लैंगिक संबंध ठेवले तर तो बलात्कार ठरत नाही, तर त्याला व्यभिचाराचा गुन्हा म्हणतात. यात पाच वर्षे तुरूंगवास किंवा दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होते, पण यात जी स्त्री असे लैंगिक संबंध ठेवते तिला दोषी धरले जात नाही किंवा शिक्षाही दिली जात नाही. यात केवळ विवाहित महिलेशी लैंगिक संबंध ठेवणे हा व्यभिचार ठरतो. विधवा, वेश्या किंवा अविवाहित महिलांना हे कलम लागू होत नाही, असे दिल्ली उच्च न्यायालयाने ब्रिज लाल विरूद्ध राज्य सरकार (१९९६) खटल्यात स्पष्ट केले होते