News Flash

आजोबांसाठी ऑक्सिजन हवा असल्याचं पोस्ट करणाऱ्या तरुणाविरोधात UP पोलिसांनी नोंदवला गुन्हा

या तरुणाच्या आजोबांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला

फाइल फोटो (फोटो सौजन्य: पीटीआयवरुन साभार)

आपल्या आजोबांना ऑक्सिजनची गरज असून मदत करण्यासंदर्भातील मेसेज पोस्ट केल्याप्रकरणात उत्तर प्रदेशमधील पोलिसांनी एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल केलाय. या तरुणाने भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने खोटा मेसेज व्हायरल केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये थेट केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही या मुलाला मदत करण्यासंदर्भात दखल दिली.

शशांक यादव या तरुणाने, ‘माझ्या आजोबांना ऑक्सिजन सिलेंडरची गरज आहे’, असं ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये शशांकने त्याच्या आजोबांना करोनाची लागण झालीय की नाही हे पोस्ट केलेलं नव्हतं. नंतर शशांकच्या आजोबांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. उत्तर प्रदेशमध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यातील अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. मागील काही दिवसांपासून अनेकांनी ट्विटरच्या माध्यमातून नातेवाईकांना ऑक्सिजन हवा असल्याची मागणी केल्याचं पहायला मिळालं. अशाचप्रकारे शशांकनेही त्याच्या आजोबांसाठी ऑक्सिजनची गरज असल्याचं ट्विट सोमवारी केलं होतं.

शशांकने आपल्या ट्विटमध्ये अभिनेता सोनू सुदला टॅग केलं होतं. शशांकचा मित्र असणाऱ्या अंकितने हा मेसेज सोशल नेटवर्किंगवर शेअर करत पत्रकार असणाऱ्या अरफा खानुम शेरवानी यांच्याकडे मदत मागितली. त्यांनी हा मेसेज ट्विट करत ऑक्सिजनची गरज असल्याचे म्हटले. अरफा यांनी अमेठीच्या खासदार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनाही टॅग केलं होतं. मात्र या मेसेजमध्येही शशांकच्या आजोबांना करोनाची लागण झाल्याचा काही उल्लेख नव्हता.

या ट्विटवर रिप्लाय करत स्मृती यांनी शशांकला अनेकदा कॉल करुन संपर्क झाला नाही. यासंदर्भात मी जिल्हाधिकारी आणि अमेठीच्या पोलिसांना फॉलोअप घेण्यास सांगितल्याची माहिती दिली. स्मृती यांनी ट्विटरवरुन, “शशांकला तिनदा कॉल केला मात्र त्याने उत्तर दिलं नाही. यासंदर्भात अमेठीचे जिल्हाधिकारी आणि अमेठी पोलिसांना शशांकचा शोध घेऊन मदत करण्यास सांगितलं आहे,” असं ट्विट केलं होतं.

थोड्या वेळाने शशांकच्या आजोबांचं निधन झालं. त्यानंतर स्मृती यांनी ट्विटरवरुन त्यांना श्रद्धांजली अर्पण करत, “शशांकच्या क्रमांकावर सतत आम्ही फोन करत होतो. यामध्ये मुख्यमंत्री कार्यालय, अमेठी पोलिसांचाही समावेश होता. त्याने फोन उचलला असता तर मदत करता आली असती,” असं म्हटलं.

मंगळवारी सायंकाळी अमेठीचे जिल्हाधिकारी अरुण कुमार यांनी अरफा यांच्या ट्विटला रिप्लाय करत जिल्ह्याची मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांच्या अहवालाचा संदर्भ दिला. शशांकच्या आजोबांना करोनाची लागण झाली नव्हती. त्यांच्यावर दुर्गापुरमधील एका रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. त्यानंतर पोलिसांनी सायंकाळी शशांकच्या ट्विटला उत्तर देत शशांकचे ८८ वर्षीय आजोबा हे करोनामुळे नाही तर हृदयविकाराचा झटका आल्याने मरण पावल्याचे सांगितलं.  “सध्याच्या काळामध्ये अशाप्रकारे भीती निर्माण करणाऱ्या पोस्ट सोशल नेटवर्किंगवर करणं हे कायद्याने गुन्हा आहे,” असंही अमेठी पोलिसांनी म्हटल्याचं इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

अमेठीचे पोलीस अधीक्षक दिनेश कुमार यांनी इंडिया टुडेशी बोलताना शशांक यादव राजस्थानवरुन अमेठीमध्ये २५ एप्रिल रोजी आला होता, असं सांगितलं. “आजोबा आजारी पडल्यानंतर तो अमेठीत आलेला. त्यानंतरच त्याने ट्विटरवरुन आजोबांसाठी ऑक्सिजन हवा असल्याचं म्हटलं होतं. त्याने सोनू सूदलाही टॅघ केलं होतं. त्याने ऑक्सिजन सिलेंडरसंदर्भात चौकशी केली नव्हती. तसेच त्याचे आजोबा करोना पॉझिटिव्ह नव्हते,” असं कुमार म्हणालेत.

आजोबा करोना पॉझिटिव्ह नसताना अशाप्रकारचं ट्विट करुन भीतीचं वातावरण निर्माण केल्याप्रकरणी शशांकविरोधात ऑक्सिजनची कमतरता असल्याची अफवा पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचं कुमार यांनी स्पष्ट केलं आहे. शशांकला अटक करण्यात येणार असल्याचं सांगत, असं केल्याने करोना काळात अफवा पसरवणाऱ्यांना संदेश देता येईल असंही कुमार म्हणालेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2021 6:14 pm

Web Title: man sends sos for oxygen for grandfather up police books him for spreading rumours scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Covishield vaccine: लसीची किंमत १०० रुपयांनी कमी केली, आदर पुनावाला यांची घोषणा
2 “पीएम केअर फंडातून १ लाख पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स पुरवणार”- पंतप्रधान नरेंद्र मोदी
3 ऑक्सिजन सिलेंडर्सच्या काळाबाजार प्रकरणी दिल्लीत दोघांना अटक; ५ सिलेंडर्स जप्त
Just Now!
X