गाझियाबाद येथील हिंडन एअरफोर्स स्टेशनवर घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका संशयित युवकावर सुरक्षारक्षकांनी गोळीबार केला. हा युवक विमानतळावर अवैधरित्या घुसखोरी करत होता. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. तरीही त्याने याकडे दुर्लक्ष करत एअरबेसमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी संशयिताच्या पायावर गोळी झाडली. त्यामुळे तो संशयित युवक तिथेच बेशुद्ध पडला. संशयितावर हिंडन एअरबेसच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी रात्री १०.३० च्या सुमारास घडली.

विमानतळावर येण्यास मज्जाव केल्यानंतरही घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताची ओळख पटली असून त्याचे नाव सुजित असल्याचे सांगण्यात येते. सुजित हा मजुरी करतो. तो प्रतापगडचा असून आनंद विहार येथे राहतो. या घटनेनंतर विमानतळ व आजूबाजूच्या परिसरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास एक संशयित एअरबेसच्या प्रतिबंधित क्षेत्रातील भिंतीवर चढून आत घुसण्याचा प्रयत्न करता होता. या एअरबेसमध्ये विनापरवानगी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला गोळी झाडण्याचा आदेश असल्याचे, पोलीस अधिकारी हरिनारायण सिंह यांनी सांगितले.

सुजितने विमानतळामध्ये घुसण्याचा प्रयत्न का केला याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. हिंडन विमानतळ हे पश्चिम कमांडचा भाग आहे. पठाणकोट एअरबेसवरील दहशतवादी हल्ल्यानंतर पश्चिम कमांडच्या सर्व एअरबेसवर अवैधरित्या घुसखोरी करणाऱ्यांना पाहताक्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले होते.