खोट्या गुन्ह्यात अडकवल्यामुळे एका व्यक्तीला सहा वर्ष तुरुंगवास भोगावा लागला. मात्र, तब्बल सहा वर्षांनी त्याची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात दिल्लीतील एका न्यायालयानं या व्यक्तीला केवळ त्याच्या दलित ओळखीमुळे चुकीच्या पद्धतीने फसवलं असल्याचं म्हणत निर्दोष सुटका केली. “तुरुंगात असताना मला बाहेर पडण्याची, उडण्याची स्वप्ने पडायची. चिंतातूर पत्नीचा चेहरा आठवला की वाटायचं बस पकडून घरी जावं. पण जेव्हा वास्तविक परिस्थितीची जाण व्हायची तेव्हा मी तिहार तुरुंगाच्या कोठडीत स्वतःवर असलेल्या आरोपांमधून सुटका व्हायची वाट पाहत होतो,” अशी प्रतिक्रिया या व्यक्तीनं दिली.

“तुरुंगात असताना मी नेहमी स्वप्नात उडत होतो. आता माझी सुटका झाली आहे. मी स्वप्नांमध्ये जगण सोडलंय.”तो म्हणतो.

चार अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करणाऱ्या एका व्यक्तीच्या तक्रारीवरून या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही व्यक्ती सीरियल लैंगिक अपराधी असल्याचा आरोप केला होता. १८ मे २०१५ रोजी त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने ७ ऑगस्ट २०२१ रोजी त्याची सुटका केली. कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, “दलित समाजातील या व्यक्तीबद्दल मुलीच्या पालकांचे पूर्वग्रह दुषीत असल्यामुळे त्याला खोटे फसवण्यात आले होते. या व्यक्तीने दिल्लीतील त्याच्या घरासमोर कुत्र्याच्या शौच करण्यास आक्षेप घेतल्यामुळे तक्रारदाराने खोटा गुन्हा दाखल केला होता, असे तपासाअंती आढळून आले. तसेच पीडित मुलींच्या पालकांनी अशा गंभीर प्रकरणात मुलींना खोटं बोलायला लावणं ही लाजिरवाणी आणि निंदनीय बाब आहे,” असंही न्यायालयानं म्हटलंय.

या व्यक्तीची निर्दोष सुटका केल्यानंतर दोन महिन्यांच्या आत त्याला एक लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. न्यायाधीशांनी निकाल जाहीर केल्यानंतर ५५ वर्षीय व्यक्तीच्या अश्रुंचा बांध फुटला. तब्बल सहा वर्षांनंतर मी माझ्या कुटुंबीयासोबत राहू शकेल, असं तो म्हणाला.

त्याची सुटका होऊन एका महिना झालाय. मात्र, अजुनही तो या स्वातंत्र्याची सवय लावून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्याचं लसीकरण झालंय. पण त्याला बाहेर पडायचं नाही. “आता सर्वकाही बदललंय. प्रत्येकजण मास्क घालतो, लोक बाहेर जाण्यापूर्वी दोनदा विचार करतात. मी लॉकडाऊनचे दिवस कारागृहात घालवले. या सर्व प्रकरणानंतर माझी मनस्थिती योग्य नाही. मी बाहेर पडण्यासाठी माझा वेळ घेईन,” असं तो म्हणतो.

दरम्यान, आता त्याला रस्ता ओलांडण्याची भीती वाटते, वाहनांचा कर्कश आवाज त्याला त्रास देतो आणि तो अनेकदा घरी जाण्याचा रस्ता विसरतो. “स्मार्टफोन कसा वापरायचा हे मी विसरलो आहे. मी तो चालू आणि बंद करायला शिकलो आहे. मी किराणा सामानही विकत घेऊ शकत नाही. माझी भूक कमी झाली आहे. मी नेहमी थकून जातो. मी काम करू शकत नाही,” असं तो म्हणतो.

तिहारमध्ये तो चित्र काढायला शिकला. राजकारणी, हिंदू देवता, बँकेशी संबंधित जाहिराती आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण हे चित्र काढण्यासाठी त्यांचे आवडते विषय होते. आता मला फक्त राजस्थानमधील माझ्या आजारी आईला भेटायचंय. ती मला फोन करून बोलावते, रडते. पण तिला भेटायला जायला माझ्याकडे पैसे नाहीत, असं म्हणताना त्याला अश्रू अनावर होतात.

तो म्हणतो की, “तुरुंगातील सुरुवातीची काही वर्षे मी चिडायचो. पण आता मी माफ करायला शिकलोय.” बायबल हातात घेत तो म्हणतो, “यात काय लिहिले आहे ते मला फारसं समजत नाही. पण सर्वांचा देव एक आहे, एवढं मात्र नक्की. माझ्याविरोधात खोट खटला दाखल करणाऱ्यांना मी माफ केलंय. मी दलित असल्याने मला फसवण्यात आले आणि माझ्या आयुष्याची सहा वर्षे माझ्याकडून हिरावून घेण्यात आली.”

या व्यक्तीची ५८ वर्षीय पत्नी कचरा वेचून दिवसाला १०० रुपये कमावते. तर त्याचा ३० वर्षांचा मुलगा डेनिम फॅक्टरीमध्ये १२ तास काम करून दरमहा १२ हजार कमावतो. त्यांच्यावर सध्या ५ लाख रुपयांचे कर्ज आहे. त्याची पत्नी, मुले, नातवंडे आणि इतर नातेवाईकांसह १२ जणांचे कुटुंब दोन लहान खोल्यांमध्ये राहतात. “आम्ही आधी जिथे राहायचो त्याठिकाणी दलित म्हणून जन्माला आल्यामुळे परिसरातील लोकांनी आमचा तिरस्कार केला. रात्रंदिवस ते आम्हाला तिथून घालवण्याचा प्रयत्न करायचे,” असं त्याची पत्नी सांगते.