14 December 2017

News Flash

सोनू निगमला फेसबुकवरून पाठिंबा देणे पडले महागात, दोन युवकांना भोसकले

यापुढे आपण आता फक्त सोनू निगमचेच गाणे ऐकणार असे म्हटले होते.

नवी दिल्ली | Updated: April 21, 2017 9:18 AM

उज्जैनच्या शिवमने फेसबुकवरील एका पोस्टमध्ये यापुढे आपण आता फक्त सोनू निगमचेच गाणे ऐकणार असे म्हटले होते.

प्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगमने अजानवरून केलेल्या ट्विटवरून निर्माण झालेला वाद अजूनही मिटलेला दिसत नाही. सोशल मीडियावर सोनू निगमला पाठिंबा देणे मध्य प्रदेशच्या दोन युवकांना चांगलेच महागात पडले आहे. सोनू निगमचे समर्थन केल्याने मुलांच्या एका गटाने त्यांना चाकूने भोसकले. ही घटना उज्जैन येथील फ्रीगंज भागात घडली. जखमी मुलाचे नाव शिवम असून त्याच्या मित्रालाही संशयितांनी चाकू भोसकून जखमी केले आहे.

दोन दिवसांपूर्वी गायक सोनू निगमने अजानची नमाज ध्वनीक्षेपकावरून वाजवण्यावर ट्विट केले होते. यावरून देशात मोठा वाद निर्माण झाला असतानाच त्याला समर्थन देणारेही पुढे आले होते. उज्जैनच्या शिवमने फेसबुकवरील एका पोस्टमध्ये यापुढे आपण आता फक्त सोनू निगमचेच गाणे ऐकणार असे म्हटले होते. त्यावरून फैजान खान नावाच्या एका मुलाने आपल्या ७ ते ८ मित्रांसह शिवमला त्याच्या या पोस्टबद्दल जाब विचारला आणि त्याला चाकूने भोसकले. या वेळी शिवमबरोबर त्याचा मित्रही होता. त्यालाही या टोळक्याने भोसकले. दोघांवर रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा संबंधित युवकावर दाखल केला आहे.

‘मी मुस्लिम नसूनही सकाळी अजानच्या आवाजानेच मला जाग येते. भारतातील बळजबरीच्या धार्मिक परंपरा कधी थांबणार?’ असा सवाल सोनू निगमने ट्विटवरुन उपस्थित केला होता. सोनूच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर नेटिझन्सनी त्याला चांगलेच धारेवर धरले होते. कलाकाराने इतर धर्मांचा आणि रुढींचाही आदर केला पाहिजे, असा सल्ला देत सोनूवर नाराजीचा सूर आळवण्यात आला होता.

त्यानंतर त्याने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली होती. ‘कोणालाही दुखावण्याचा, कोणत्याही धर्माची निंदा करण्याचा माझा हेतू नाहीये. त्यासोबतच कोणाचाही अनादर करण्यासाठी मी ते ट्विट केले नव्हते. मुळात माझा विरोध आहे लाउडस्पीकरला, त्यामुळे होणाऱ्या मोठ्या आवाजाला,’ असे म्हणत सोनूने लहानसहान गोष्टींना उगाचच हवा देऊन त्याचा बोभाटा करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट शब्दांत सांगितले होते.

First Published on April 21, 2017 9:18 am

Web Title: man stabbed in madhya pradeshs for writing facebook post in support of sonu nigams azaan tweet