पत्नीला फिरण्यासाठी म्हणून लाँग ड्राइव्हला नेऊन तिची गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना दिल्लीमध्ये घडली आहे. रोजच्या भांडणांना कंटाळून नवऱ्याने दोन साथीदारांच्या मदतीने हत्येचे टोकाचे पाऊल उचलले. नॅन्सी शर्मा (२०) असे मृत महिलेचे नाव असून यावर्षी मार्च महिन्यातच तिचे साहिल चोप्राबरोबर लग्न झाले होते. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
नॅन्सीला रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पाटर्यांमध्ये जाण्याची सवय होती. तिचे बाहेर विवाहबाह्य संबंध असल्याचाही साहिलला संशय होता. आपण पत्नीकडे घटस्फोटही मागितला होता असे साहिलने पोलिसांना सांगितले. नॅन्सी आणि साहिल दोघे पश्चिम दिल्लीत जनकपुरी येथे राहतात. साहिलने नॅन्सीला हरयाणात पानिपत येथे नेऊन तिची हत्या केली.नऊ नोव्हेंबरच्या रात्री साहिल आणि नॅन्सीमध्ये जोरदार भांडण झाले. त्यानंतर साहिलने हत्या करण्याचा निर्णय घेतला.
त्यासाठी त्याने चुलत भाऊ शुभम आणि ड्रायव्हर बादलची मदत घेतली. त्यांनी पिस्तुलाची व्यवस्था केली. साहिल चोप्राने नॅन्सीची भांडणाबद्दल माफी मागितली व तिला बाहेर फिरायला येण्यासाठी राजी केले. साहिलने त्याच्यासोबत शुभम आणि बादलला सुद्धा घेतले. चौघे सेडान कारने निघाले.
दुपारी पानिपत जवळ पोहोचल्यानंतर नॅन्सीने गाडी थांबवण्यास सांगितले. स्वच्छतागृहाजवळ साहिलने गाडी थांबवली ती निर्जन जागा होती. नॅन्सी गाडीतून उतरुन चालत असताना साहिलने अत्यंत जवळून तिच्यावर गोळी झाडली. त्यानंतर तिघांनी तिचा मृतदेह झुडूपात फेकला व तिथून निघून गेले. नॅन्सीचे वडिल संजय शर्मा तिला फोन करायचे. पण प्रत्येकवेळी फोन कट व्हायचा. संजय यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आपला तपास सुरु केल्यानंतर त्यांना साहिलवर संशय आला. पोलिसांनी आपला खाक्या दाखवल्यानंतर साहिलने गुन्ह्याची कबुली दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 29, 2019 7:54 pm