एका माणसाच्या पोटातून ३५ किलोंचा ट्युमर डॉक्टरांनी बाहेर काढला आहे. या घटनेमुळे या माणसाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. त्याला गेल्या दोन वर्षांपासून वजन वाढल्याची समस्या भेडसावत होती. कॅलिफोर्नियातील डाऊनी या ठिकाणी राहणाऱ्या हेक्टर हेर्नांडिझला आता पोटातून ३५ किलोचा ट्युमर निघाल्याने हायसे वाटले आहे.

हेक्टरचे पोट गेल्या दोन वर्षांपासून वाढू लागले होते. त्याला त्याचे मित्र बिअर कमी पित जा असा सल्ला देऊ लागले. मात्र हेक्टरला कोणत्याही प्रकारचे व्यसन नाही. त्याने व्यायाम सुरु केला. तरीही त्याचे पोट काही कमी होईना. त्याच्या हाता-पायांचा आकार आणि पोटाचे आकारमान यामध्ये विसंगती होती. त्यामुळे त्याने डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी त्याला तपासल्यानंतर हेक्टरच्या पोटात ३५ किलोचा ट्युमर असल्याचे डॉक्टरांना समजले. त्यानंतर हेक्टरवर शस्त्रक्रिया करण्यात आली. या ट्युमरचा आकारा एका मोठ्या कलिंगडाएवढा होता असेही डॉक्टरांनी सांगितले आहे.

हेक्टर हा लॉस एंजलिस येथील एका आयटी कंपनीत काम करतो. त्याचे पोट वाढू लागल्याने त्याने व्यायाम करण्यास सुरुवात केली. मात्र त्याचा हाता-पायांचे आकारमान कमी होऊ लागले तरीही पोट कमी झालेच नाही. दोन वर्षे हा त्रास सहन केल्यावर त्याने डॉक्टरांकडे धाव घेतली. डॉक्टरांनी त्याच्या पोटाचा एक्स रे काढला, सोनोग्राफीही केली ज्यानंतर त्याच्या पोटात भल्यामोठ्या कलिंगडाएवढा ट्युमर असल्याचे त्यांना समजले. डेलिमेलने या संदर्भातले वृत्त दिले आहे. शस्त्रक्रिया करून हेक्टरचा ट्युमर काढण्यात आला. ट्युमर शक्यतो ९ ते १३ किलोच्या आसपास असतो. आम्ही पहिल्यांदाच इतका मोठा ट्युमर पाहिला असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.