२२ वर्षांच्या एका तरूणाला मित्राशी इंग्रजीतून का बोलत होतास? असा प्रश्न विचारत नशेत असलेल्या पाच लोकांनी मारहाण केल्याचा प्रकार दिल्लीत घडला आहे. या मारहाणीनंतर ३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील कॅनॉट प्लेस या ठिकाणी असलेल्या ल्यूटेन्स या पंचतारांकित हॉटेलमध्ये वरूण गुलाटी हा तरूण आला होता. वरूणने त्याचा मित्र दक्षला हॉटेलबाहेर असलेल्या मित्राच्या कारमध्ये सोडले. त्यानंतर वरूण हॉटेलमध्ये परतत होता.

वरूण परतत असतानाच, नशेत असलेल्या पाच जणांच्या टोळक्याने वरूणभोवती घेराव घातला. एवढेच नाही तर,  तू तुझ्या मित्राशी इंग्रजीतून का बोलत होतास? अशी विचारणा करत वरूणसोबत वाद घालायला सुरूवात केली. ज्यानंतर वरूणनेही वाद घातला. वरूणचा आवाज चढल्यावर या पाचही जणांच्या टोळक्याने वरूणला मारहाण केली आणि एका वाहनातून पळून गेले.

वरूणने या वाहनाचा नंबर नोंदवून घेतला आणि झालेल्या प्रकाराबाबत पोलिसात तक्रार केली. वाहनाचा नंबर हाती लागल्याने पोलिसांना या दादागिरी करणाऱ्यांना शोधणे सोपे गेले. पाचपैकी तीन जणांना अटक करण्यात आली असून दोघांचा शोध सुरू आहे असे पोलिसांनी म्हटले आहे.