भारतीय रेल्वे ऑन ट्रॅक तसेच ऑनलाइनही अपडेट होताना दिसत आहे. सुरेश प्रभू यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळात रेल्वेमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यापासून ट्विटरसारख्या माध्यमातून रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या समस्या सोडवण्यास सुरुवात केली. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाचा कारभार हाती घेणाऱ्या पियुष गोयल यांनीही सोशल नेटवर्किंगवरून रेल्वे संदर्भातील माहिती वेळोवेळी सामान्यांपर्यंत पोहचवण्याबरोबर त्यांच्या समस्यांचे निराकरण एका ट्विटवर किंवा फोन कॉलवर होईल यासंदर्भातील काळजी घेतली. रेल्वे प्रशासनाच्या अशाच एका तत्परतेचा अनुभव रेल्वेने प्रवास करताना अवेळी मासिक पाळी सुरु झालेल्या माहिला प्रवाश्याला आला.

बेंगळुरुहून बरेलीला जाणाऱ्या हौसपेठ पॅसेंजर गाडीमधील महिला प्रवाशाबरोबर हा सर्व प्रकार घडला. बंगळुरुवरून रात्री सव्वा दहाला निघाली आणि ती दुसऱ्या दिवशी बरेलीला सकाळी ९ वाजून ४० मिनिटांनी पोहचणे अपेक्षित होते. या गाडीने प्रवास करणाऱ्या आर्कीटेक्चरच्या विद्यार्थीनीची मासिक पाळी सुरु झाली. याबद्दल तिचा मित्रा विशाल खानापुरे याने ट्विट करुन रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि रेल्वे मंत्रालयाकडे यासंदर्भात मदत मागितली. त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहीले होते, ‘पियुष गोयल इमर्जन्सी आहे. माझी एक मैत्रिण होपसेट पॅसेंजरने बेंगळुरुवरून बरेलीला प्रवास करत आहे. तिला मासिक पाळीच्या गोळ्या हव्या आहेत. कृपया मदत करावी.’


खरं तर या ट्विटचा काही फायदा होईल की नाही हे विशाललाही ठाऊक नव्हते. मात्र खरोखरच विशालच्या मैत्रिणीला रेल्वे अधिकाऱ्यांनी तिला हव्या असणाऱ्या गोळ्या आणि इतर सामान रात्री दोन वाजता दिल्या जागी आणून दिले. याबद्दल टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना विशाल म्हणाला, ‘ट्विटनंतर माझ्या मैत्रिणीला खरोखरच मदत मिळाली. रात्री ११ वाजून ६ मिनिटांनी गाडीमधील एक रेल्वे अधिकारी माझ्या मैत्रिणीकडे आला. तिला कोणकोणत्या गोष्टी हव्या आहेत याबद्दलची माहिती आणि फोन नंबर लिहून घेतला. त्यानंतर रात्री दोन वाजण्याच्या सुमारास अरासीकेरी स्थानकामध्ये गाडी पोहचली तेव्हा मैसूर रेल्वे विभागाचे रेल्वे अधिकारी माझ्या मैत्रिणीला लागणाऱ्या गोळ्या आणि इतर साहित्य घेऊन ट्रेनमध्ये आले आणि ते साहित्य त्यांनी तिला दिले.’
मैसूर रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही घटना खरी असल्याची माहिती दिली. अनेकदा ट्विटवरुन किंवा १३८ या हेल्पलाइन क्रमांकावरून प्रवासी अशाप्रकारची मदत मागवतात. आम्ही अनेकदा अशाप्रकारे २४ तास मदत करण्यासाठी तयार असतो.

ही मदत मिळाल्यानंतर विशालने पुन्हा एकदा ट्विट करुन सर्व रेल्वे अधिकाऱ्यांचे, रेल्वे प्रशासनाचे आणि रेल्वे मंत्र्यांचे आभार मानत खरोखरच अच्छे दिन आल्याचे मत नोंदवले.

अशाप्रकारे अनेकदा रेल्वे प्रवाशांना ट्विटरच्या माध्यमातून मदत मिळते. यासंदर्भात रेल्वेने अनेकदा आपल्या ट्विटर हॅण्डलवरून विभागीय रेल्वे कार्यालयांचे ट्विटर हॅण्डलही पोस्ट केले आहेत. एकंदरीतच एकीकडे रेल्वे प्रवाशांकडे दूर्लक्ष करते अशी ओरड होत असताना अशा अनुभवांमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होताना दिसत आहे.