पाळीव कु्त्र्यावर दगड भिरकावणे एका व्यक्तीला चांगलेच महाग पडले. या माणसाला प्राण गमावून त्याची किंमत चुकवावी लागली. आपल्या कुत्र्याला दगड मारला म्हणून संतापाच्या भरात मालकाने केलेल्या गोळीबारात आफाक अली यांचा मृत्यू झाला. उत्तर पूर्व दिल्लीत रविवारी संध्याकाळी ही धक्कादायक घटना घडली.

आफाक अली व्यवसायाने टेलर होते. कुत्र्याच्या मालकाविरोधात पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. मेहताब असे आरोपीचे नाव आहे. मेहताब मूळात गुन्हेगारी पार्श्वभूमीचा माणूस आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर तो फरार झाला आहे. कुत्र्यावर दगड मारण्यावरुन आफक अली आणि मेहताबमध्ये वादावादी झाली. त्यातूनच ही गोळीबाराची घटना घडली असे उत्तर पूर्व दिल्लीचे पोलीस उपायुक्त अतुल कुमार ठाकूर यांनी सांगितले.

आफकच्या सासऱ्यांनी संध्याकाळी सातच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला फोन लावून जावयावर कोणीतरी गोळीबार केला असल्याची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा आफकला गुरु तेग बहादूर रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती त्यांना देण्यात आली. आफाकला तपासल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले.

आफाक मेहताबच्या घराजवळून चालला होता. त्यावेळी मेहताबच्या कुत्र्याने आफाकच्या दिशेने भुकांयला सुरुवात केली. ज्यावेळी कु्त्र्याने आफाकचा चावा घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने दगड उचलून कुत्र्यावर भिरकावला. मेहताबने आफाकला दगड मारताना पाहिले. त्यावरुन दोघांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. वाद वाढल्यानंतर मेहताबने त्याच्याजवळची बंदूक काढली व आफाकवर गोळया झाडल्या.