मोठा गाजावाजा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात आयुष्मान भारत या महत्काकांक्षी योजनेची घोषणा केली, पण या योजनेचा बोजवारा उडताना दिसत आहे. कारण, या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना किती अडचणींचा सामना करावा लागतोय हे उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये समोर आलं आहे. येथील किंग जॉर्ज वैद्यकीय विद्यापीठात शाहजहांपूर येथून उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाने आणि त्याच्या नातेवाईकांनी आयुष्मान भारत योजनेअंतर्गत मोफत उपचाराची मागणी केली असता, त्याला डॉक्टरांनी जा आधी मोदींकडून पैसे घेऊन या, नंतर मोफत उपचार होतील असं उत्तर दिल्याचं समोर आलं आहे.


 
शाहजहांपूर येथील तिलहरचे रहिवासी 28 वर्षीय कमलेश नावाच्या एका व्यक्तीसोबत ही घटना घडली. ते वीज कार्यालयात कर्मचारी आहेत, वीजेचं काम करताना करंट लागल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं, तेथून डॉक्टरांनी पुढे हलवण्यास सांगितल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना सोमवारी रात्री लखनऊमधील किंग जॉर्ज वैद्यकीय विद्यापीठाच्या इस्पितळामध्ये आणलं. त्यावेळी रुग्णाचे काका हरिश्चंद्र यांनी डॉक्टरांना आयुष्मान योजनेचे कुटुंबाला मिळालेले कार्ड दाखविले. मात्र, त्यावर डॉक्टर संतापले आणि हे कार्ड घ्या आणि पंतप्रधान मोदींकडे जा, व त्यांच्याकडून पैसे घेऊन या असा उलट सल्ला डॉक्टरांनी दिला असा आरोप त्यांनी केला आहे. त्यानंतर तिलहरचे आमदार रोशन लाल यांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यांच्या मध्यस्थीनंतर रुग्णावर उपचार सुरू झाले. उपचार सुरू केल्यानंतरही जाणूनबुजून उपचारात दिरंगाई आणि बाहेरून 5 हजार रुपयांची औषधं आणावी लागली असा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान आमदार रोशन लाल यांनी या घटनेवर नाराजी व्यक्त करत याबाबत पाठपुरावा करेन असं म्हटलं आहे. दरम्यान, ही योजना सर्वप्रथम लागू झालेल्या इस्पितळांपैकी एक आमचं इस्पितळ आहे, संबंधित डॉक्टरवर कारवाई केली जाईल असं वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.