सध्या सोशल मीडियावर एका वृद्ध व्यक्तीचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती व्यक्ती एका रेल्वे स्थानकावर तिकिट काढण्यासाठी उभी असते. पण अचानक ती व्यक्ती सोशल डिस्टंट न पाळता समोर उभ्या असलेल्या व्यक्तीच्या जवळ जाते आणि नकळत त्याच्या अंगावर थुंकते. या व्यक्तीचा हा थुंकतानाचा व्हिडीओ भारतातील नसून थायलंडमधील आहे.

या वृद्ध व्यक्तीचे नाव अनान सहोह असून त्यांचे वय ५६ वर्षे आहे. या व्यक्तीचा बुधवारी प्रवासादरम्यान मृत्यू झाल्याचे वृत्त न्यूयॉर्क पोस्टने दिले आहे. मृत्यूपूर्वी अनान बँकॉकमधील Bang Sue या रेल्वे स्थानकावर तिकिट काढत होते. रेल्वे स्थानकात त्यांना करोनाचा संसर्ग झाला आहे की नाही हे पाहण्यात आले. तेव्हा त्यांच्या शरीराचे तापमान सामान्य व्यक्तीच्या शरीरा इतकेच असल्यामुळे त्यांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. नंतर ते तिकीट काढण्यासाठी तिकीट खिडकी जवळ आले. तिकीट काढत असताना ते पुढे असलेल्या व्यक्तीच्या अंगावर थुंकले. पण समोरच्या व्यक्तीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.

अनान नंतर रेल्वेमध्ये चढले. पण प्रवास करत असताना त्यांना खोकला येऊ लागला आणि उर्टीसारखे वाटू लागले. म्हणून ते रेल्वेमधील स्वच्छता गृहाजवळ गेले. तेथे पोहचताच ते खाली कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांची करोना चाचणी करण्यात आली आणि ती पॉझिटीव्ह आली. थायलंड रेल्वे मंडळाच्या संचालकांनी याबाबत माहिती दिली आहे. ‘आम्ही रेल्वे स्थानकातील हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनान ज्या व्यक्तीच्या अंगावर थुंकले त्यांचा शोध घेत आहोत. पण अद्याप त्या व्यक्तीचा शोध लागलेला नाही’ असे त्यांनी म्हटले आहे.

अनान यांनी प्रवास केलेल्या रेल्वेच्या डब्यात आणखी १५ प्रवासी प्रवास करत होते. या १५ लोकांच्या यादीमध्ये ११ प्रवासी होते आणि इतर रेल्वे कर्मचारी होते. त्या सर्वांना विलगीकरण कक्षेमध्ये ठेवण्यात आले आहे.