एखाद्या वाहनात एकच व्यक्ती प्रवास करत असेल, तरी कोविड-१९ महासाथीच्या संदर्भात हे सार्वजनिक ठिकाण असून, या व्यक्तीचा बाह््य जगाशी संबंध येण्याच्या अनेक शक्यता आहेत. त्यामुळे मोटारीच्या आतही मुखपट्टी घालणे अनिवार्य आहे, असा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी दिला.

खासगी मोटारीत एकट्यानेच प्रवास करताना मुखपट्टी न घातल्याने दिल्ली पोलिसांनी त्यांना ५०० रुपये दंड ठोठावला होता. या कारवाईला आव्हान देणाऱ्या चार वकिलांच्या याचिका फेटाळून लावताना न्या. प्रतिभा सिंह यांनी हा निर्णय दिला. मुखपट्टी केवळ सार्वजनिक ठिकाणी घालायची असते आणि खासगी वाहनांना सार्वजनिक ठिकाण म्हणता येऊ शकत नाही, असा युक्तिवाद याचिकाकत्र्या वकिलांनी केला होता.

‘सार्वजनिक ठिकाण’ या शब्दाचा अर्थ कोविड-१९ महासाथीच्या संदर्भात लावायला हवा, असे न्यायालयाने सांगितले. ‘या परिस्थितीत अनेक शक्यता आहेत. एखादी व्यक्ती मोटारीत एकट्याने बसली असताना तिचा बाह््य जगाशी संपर्क येऊ शकतो. त्यामुळे केवळ ही व्यक्ती मोटारीत एकटीच प्रवास करत असल्याने ही मोटार सार्वजनिक ठिकाण नसल्याचे म्हणता येऊ शकत नाही’, असे मत न्यायालयाने नोंदवले.

हे वाहन शहरभर फिरत असल्याने, एखाद्या विशिष्ट वेळी त्यात एकच व्यक्ती बसलेली असली तरी बदलणाऱ्या परिस्थितीत तिचा इतर लोकांशी संपर्क येण्याचा धोका असल्यामुळे हे सार्वजनिक ठिकाणच ठरते. त्यामुळे या वाहनात बसताना मुखपट्टी घालणे अनिवार्य आहे, असेही न्यायालयाने सांगितले.