महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी देशभरातील सार्वजनिक परिवहन विभागाच्या बसगाड्यांमध्ये पॅनिक बटन, सीसीटीव्ही आणि वाहनाचे ठिकाण दर्शविणारे उपकरण या सुविधा बंधनकारक करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली. येत्या २ जूनला यासंदर्भातील सूचना जारी करण्यात येणार असल्याचे गडकरी यांनी दिल्ली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. दिल्लीतील निर्भया प्रकरण लक्षात घेता महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पॅनिक बटन, सीसीटीव्ही आणि वाहनाचे ठिकाण दर्शविणारे उपकरण या सुविधा सार्वजनिक विभागाच्या बसगाड्यांमध्ये बंधनकारक करण्यात आल्याचे गडकरी यांनी सांगितले. याशिवाय, २३ पेक्षा जास्त आसनक्षमतेच्या बसगाड्यांमध्ये जीपीएस यंत्रणेशी जोडलेले सीसीटीव्ही लावण्याचा सूचनेचाही नव्या नियमांमध्ये समावेश आहे. या नव्या सुविधेमुळे महिलांना बसने प्रवास करताना कोणताही धोका जाणवल्यानंतर त्या पॅनिक बटन दाबून जवळच्या पोलीस ठाण्यात कळवू शकतात. पॅनिक बटन दाबल्यानंतर बसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रण नजीकच्या नियंत्रण कक्षात दिसण्यास सुरूवात होईल. तसेच बसने निर्धारित रस्ता सोडून अन्य रस्त्याने जाण्यास सुरूवात केल्यास बसमधील यंत्रणेकडून तात्काळ यासंबंधीची माहिती नियंत्रण कक्षाला कळविली जाईल. आगामी काळात बसगाड्यांचे उत्पादन करतानाच त्यांच्यामध्ये ही उपकरणे बसविण्यात येतील. या उपकरणांची मोठ्याप्रमाणावर खरेदी केल्यास हा खर्च कमी होऊ शकतो, अशी माहिती गडकरी यांनी दिली.