गोव्यातील मांडवी नदीच्या पाण्यात ‘कॉलीफॉर्म बॅक्टेरिया’चा मोठय़ा प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यामुळे हे पाणी मासेमारी तसेच पोहण्यासाठीही असुरक्षित असल्याचा निष्कर्ष राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने एका अभ्यासाअंती काढला आहे.
मांडवी नदीच्या ‘कॉलीफॉर्म बॅक्टेरिया’ चे वाढते प्रमाण धोकादायक ठरत असून त्यामुळे हे पाणी आंघोळ, जलक्रीडा तसेच मासेमारीसाठी धोकादायक ठरत असल्याचे मंडळाच्या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. मांडवी नदीच्या किनाऱ्यावरील कॅसिनोच्या जहाजांमुळे नदीचे पाणी प्रदूषित होत असल्याच्या तक्रारीची सुनावणी सध्या राष्ट्रीय हरित लवादासमोर सुरू असून या मंडळास यासंबंधीचा अहवाल सादर करण्यात येणार आहे. किनाऱ्यावरील कॅसिनोच्या जहाजांची तपासणी केल्यानंतर त्यांच्याकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे पालन होत असल्याचे दिसून आल्यामुळे जहाजांमधून प्रक्रिया नसलेले पाणी नदीच्या पाण्यात सोडले जात असल्याची शक्यता मंडळाने फेटाळून लावली. या पाश्र्वभूमीवर, प्रदूषणाचा नेमका उगम कोठे होत आहे, याचा तपास करण्याची आवश्यकता असल्याकडे मंडळाने लक्ष वेधले आहे.
अंतर्गत जलवाहतुकीसाठी अन्य जहाजांमार्फत तसेच कॅसिनोच्या जहाजांमधून सोडण्यात येणाऱ्या तेलयुक्त आणि जहाजाच्या तळाशी असलेल्या घाणीमुळे नदीचे पाणी प्रदूषित होत आहे काय, या शक्यतेकडे संशयाची सुई वळत आहे.
गेल्या २७ ते ३१ जानेवारी २०१४ दरम्यान मांडवी नदीच्या सहा भिन्न ठिकाणांहून पाण्याच्या नमुन्यांची तपासणी आणि अभ्यास केल्यानंतर काढलेल्या निष्कर्षांच्या आधारे मे महिन्यात सदर अहवाल तयार करण्यात आला.