मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे ७ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी विशेष न्यायालयाने दोघांना फाशीची शिक्षा सुनावली. यापूर्वी न्यायालयाने इरफान आणि आसिफ या दोघांनाही दोषी ठरवले होते. ७ वर्षीय पीडित मुलीने गत महिन्यात विशेष न्यायालयात या दोन्ही आरोपींना ओळखले होते. दरम्यान, आरोपींना न्यायालयात आणले जात असताना भाजपाचे स्थानिक नेते विनय दुबेला यांनी एका आरोपीच्या कानशिलात लगावली.

गत २६ जून रोजी इरफान आणि आसिफ यांनी शाळा सुटल्यानंतर वडिलांची वाट पाहत उभ्या असलेल्या पीडित मुलीचे अपहरण केले होते. दुसऱ्या दिवशी झुडपात ती बेशुद्धावस्थेत आढळून आली होती. प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला इंदूर येथील एमवाय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. हल्लेखोरांनी पीडित मुलीवर बलात्कार करून चेहरा आणि मानेवर धारदार शस्त्राने हल्ला केला होता. अनेक दिवस तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. पोलिसांनी सामूहिक बलात्कार आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली इरफान आणि आसिफला अटक केली होती. या अमानवीय घटनेनंतर मध्य प्रदेशमधून आरोपींना फाशी देण्याची मागणी करण्यात येत होती. मुस्लीम समाजानेही घटनेचा निषेध केला होता.