मनेका गांधी यांची लोकसभेत माहिती

कुपोषणाची समस्या समूळ नष्ट करणे आणि सर्वसमावेशक विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सरकारने पुढील तीन-चार वर्षांत चार लाख अंगणवाडी केंद्रे उभारण्याची योजना आखली आहे, असे बुधवारी लोकसभेत सांगण्यात आले.

आयसीडीएसची फेररचना करणे यावर सरकारचा मुख्य भर असून त्याद्वारे कुपोषणाची समस्या समूळ नष्ट करण्याचा आमचा प्रयत्न आहे, देशात पुढील तीन-चार वर्षांत चार लाख अंगणवाडी केंद्रे उभारण्याची योजना आखण्यात आली आहे, असे महिला आणि बालविकासमंत्री मनेका गांधी यांनी सांगितले. कुपोषणाची समस्या समूळ नष्ट करणे हे सर्वसमावेशक विकासाच्या १७ उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट असल्याचे मनेका गांधी यांनी सर्वसमावेशक विकासाच्या उद्दिष्टांवरील चर्चेत हस्तक्षेप करताना स्पष्ट केले. अंगणवाडय़ांच्या इमारतींची संख्या पुरेशी नाही त्यामुळे अन्य क्षेत्रांचा समावेश करून मनरेगाअंतर्गत अंगणवाडी इमारती बांधणे गरजेचे आहे, असेही मनेका गांधी म्हणाल्या. महिलांच्या सुरक्षेबाबत मनेका गांधी म्हणाल्या की, सरकारने महिलांच्या राष्ट्रीय धोरणाचा मसुदा जारी केला आहे आणि अंतिम मसुदा पुढील महिन्यांत जारी होण्याची शक्यता आहे, असेही त्या म्हणाल्या.